अवकाळी पावसाने बळीराजाला झोपवलं; राज्यात तब्बल ६५ हजार हेक्टर क्षेत्राचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 09:07 PM2021-03-25T21:07:11+5:302021-03-25T21:08:32+5:30
काढणीला आलेलं सोन्यासारखं पीक अवकाळी पावसाने झोपवलं..
राजू इनामदार-
पुणे: राज्यातील १८ जिल्ह्यांमधील ८० तालुक्यांमधील ६५ हजार हेक्टरवरील शेतीला अवकाळी पावसाचा फटका बसला. कृषी व महसूल विभागाचा हा प्राथमिक अहवाल आहे. रब्बीच्या हंगामातील पिके काढणीला आली असतानाच हा अवकाळी पाऊस झाला. काही ठिकाणी पिके काढून उघड्यावरच ठेवली होती. अचानक झालेल्या पावसात ती भिजली व खराब झाली. एकूण ६५ हजार हेक्टर क्षेत्र पावसाने झोडपले. तर पुणे जिल्ह्यात या अवकाळी पावसाने ७३ हेक्टरचे नुकसान केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
त्यात पुणे, बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम, जळगाव, नाशिक, जालना, अहमदनगर या जिल्ह्यांचा समावेश आहे. गहू, बाजरी, कांदा,मका तसेच भाजीपालाही या पावसात सापडला.
महसूल व कृषी विभागाच्या वतीने नुकसान झालेल्या ठिकाणांचे रितसर पंचनामे करण्यात येत आहेत. ३३टक्केपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकर्याला सरकारच्या वतीने २ हेक्टरची नुकसान भरपाई देण्यात येते.
पुणे जिल्ह्यातील एकाच दिवसाच्या शनिवारी दि.(२० मार्च) अवकाळी पावसाने जिल्ह्यातील २ तालुक्यातील ७ गावांमधल्या १०७ शेतकर्यांंचे ७३ हेक्टरवरील पिकाचे नुकसान केले. रब्बी हंगामातील काढणीला आलेले व काढलेले कांदा पिक या पावसात भिजून खराब झाले. उन्हाळी खरबूज पिकही पावसाच्या तडाख्यात सापडले.
खेड व शिरूर या दोन तालुक्यातील ७ गावांंना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला. खेडमधील ४४ व शिरूरमधील ६३ असे १०७ शेतकरी बाधीत झाले. त्यांचे हाती आलेले कांदा, गहू, बाजरी, टोमॅटो हे पीक ऐन वेळच्या पावसाने खराब झाले.
शिरूर तालुक्यातील २ गावांमध्ये ४५ हेक्टरवरचा कांदा खराब झाला. खेडमधील ५ गावांमध्ये हा जोराचा पाऊस झाला. ५ हेक्टरवरील गहू नष्ट झाला. बाजरी, मका, टोमँटो या पिकाचेही असेच नुकसान झाले आहे. सातही गावांमधील अडीच हेक्टरवरील भाजीपालाही पावसात सापडला. शिरूरमधील १३ हेक्टरवरील आंब्यांच्या कैऱ्या पावसाने थेट जमिनीवर आणल्या. ऊन्हाळी खरबूजाचे पीक काहीजण आवर्जून घेतात. तेही पावसाने झोपवले.कृषी खात्याचा हा प्राथमिक अंदाज आहे.
महसूल तसेच कृषी खात्याने संयुक्त पाहणी करून पंचनामे सुरू केले आहेत. ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले असेल तर सरकारकडून २ हेक्टरची नुकसान भरपाई मिळते. प्राथमिक पाहणीतील हे नुकसान असले तरी अंतिम पाहणीनंतर त्यात फरक पडू शकतो अशी माहिती कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.