Heavy Rain: राज्यासहीत पुणे जिल्ह्यातही पावसाचा हाहाकार; ग्रामीण भागात शेळया, मेंढ्यांचा गारठून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2021 02:16 PM2021-12-02T14:16:51+5:302021-12-02T14:17:02+5:30
पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले असून राज्यातील ग्रामीण भागातही शेतकऱ्यांच्या पिकांचे आणि पशुधनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
पुणे : आग्नेय अरबी समुद्र व लगतच्या लक्ष्यद्वीप बेट समुह ते उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले असून राज्यातील ग्रामीण भागातही शेतकऱ्यांच्या पिकांचे आणि पशुधनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
पुणे जिल्ह्यात काल सकाळपासून मध्यम आणि तुरळक पावसाला सुरुवात झाली होती. पण दुपारनंतर पावसाचा जोर वाढत गेल्याने जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र दिसून आले. तर ग्रामीण भागात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील आंबेगाव, खेड, दौंड, शिरूर, जुन्नर तालुक्यात शेतकऱ्यांना पिकांबरोबरच पशुधनही गमवावे लागले आहे. कालच्या पावसानंतर शेळया, मेंढ्यांचा गारठून मृत्यू झाला आहे.
आंबेगाव तालुक्यात धोंडमाळ शिवार मध्ये पावसामुळे व गारवामुळे ३० ते ३५ मेंढरू मृत्युमुखी पडले आहेत. शिंगवे येथे (२०-२५), खडकीयेथे (४०-४५) मेंढ्या रात्री पडलेल्या पावसामुळे मृत्युमुखी पडल्या आहेत. पिंपळगाव म्हाळुंगे येथील ३, कथापूर येथील ३२ मेंढ्या रात्री पडलेल्या पावसामुळे मृत्युमुखी पडल्या आहेत. त्याबद्दल आणखी माहिती घेणे चालू असून पुढील कार्यवाही पशुवैद्यकीय अधिकारी व संबंधित विभागाला करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत.
खेड तालुक्यात अवकाळी पावसामुळे गारठून कोहिणकरवाडी येथे ७ शेळ्या व बकऱ्या मृत्युमुखी पडल्या. यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील धनगर गिरजु धनु लकडे ,मुळ रा वडगांव सावतळ,जि अहमदनगर यांचे मोठे नुकसान झाले आहे. सलग पाऊस आणि त्यामुळे निर्माण झालेल्या थंडीत बकरे आणि शेळ्या गारठल्या व मृत्युमुखी पडल्या. शेळ्या-बकऱ्या मृत्युमुखी पडल्याने नागरिकांमधून हळहळ व्यक्त होत आहे.
जुन्नर तालुक्यामध्ये देखील अनेक ठिकाणी थंडीने व पावसाने गारठून मेंढ्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्याबाबत पंचनामे असून कार्यवाही पशुवैद्यकीय अधिकारी माहिती देणार आहेत. शिरुर तालुक्यातील पिंपरी दुमाला येथे ४० ते ४५ मेंढ्या मेल्या आहेत. रामदास देवराम शिंदे आणि देविदास भानुदास शिंदे असे मेंढपाळाचे नाव आहे.