पावसामुळे बटाटा पिकाला जिवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:07 AM2021-07-24T04:07:59+5:302021-07-24T04:07:59+5:30
मागील पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. राज्यात इतरत्र पावसाने पुनरागमन केले असताना आंबेगाव तालुका याला अपवाद होता. ...
मागील पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. राज्यात इतरत्र पावसाने पुनरागमन केले असताना आंबेगाव तालुका याला अपवाद होता. तीन दिवसांपासून पावसाचे वातावरण झाले. मात्र, तुरळक सरी वगळता पाऊस पडला नाही. बुधवारी पावसाला सुरुवात झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या. रात्रीही पाऊस पडत होता. गुरुवारी सकाळी मुसळधार पाऊस कोसळला. शेतकऱ्यांची चिंता मिटली गेली. दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. या पावसाने पिकांना जीवदान मिळाले आहे. विशेषता सातगाव पठार भागातील बटाटा पीक जोमदार येईल अशी माहिती भावडी येथील शेतकरी अशोकराव बाजारे यांनी दिली. पावसाअभावी बटाटा पीक धोक्यात आले होते. कुरवंडी, कोल्हारवाडी, थूगाव, भावडी, कारेगाव, पेठ, पारगाव तर्फे खेड ही गावे बटाटा पिकाचे आगार म्हणून समजली जातात. दरवर्षी येथे सुमारे दहा हजार एकर क्षेत्रात बटाटा लागवड केली जाते. मात्र, मागील दोन वर्षांपासून निसर्गाची अवकृपा व कमी मिळणारा बाजारभाव यामुळे लागवड क्षेत्र कमी झाले आहे. यावर्षी केवळ ५ हजार एकर क्षेत्रावर बटाटा लागवड झाली. सुरवातीच्या ओलीवर लागवड करून शेतकरी पावसाची वाट पाहत होते. मात्र, नंतर पावसाने चांगली दडी मारली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले. दोन-तीन दिवसात पाऊस पडला नसता तर बटाटा पीक पूर्णपणे वाया गेले असते. आता पडणाऱ्या पावसाने शेतकऱ्यांच्या जीवात जीव आला आहे. काही भागात बटाट्याची उगवण झाली आहे.अशा ठिकाणी पावसाने पीक जोमदार येईल अशी माहिती कोल्हारवाडी येथील जयसिंग एरंडे यांनी दिली.पावसाने खरीपातील पिकांना जीवदान मिळाले आहे.
फोटो दमदार पावसाने सातगाव पठार भागातील बटाटा पिकाला जीवदान मिळाले आहे.