भोर तालुक्यात पावसाचा कहर! तब्बल ११ ठिकाणी कोसळल्या दरडी; रस्ता बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2021 06:36 PM2021-07-23T18:36:13+5:302021-07-23T18:37:20+5:30
गुरूवारी रात्री आणि शुक्रवारी सकाळपासून तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली.
भोर : तालुक्यात पावसाचा कहर गेल्या तीन दिवसांपासून सुरू आहे. गुरूवारी रात्री आणि शुक्रवारी सकाळपासून तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली. संतंतधार पावसामुळे तालुक्याच्या पश्चिम भागातील भोर-महाड रस्त्यावर जवळपास ११ ठिकाणी तर पसुरे, पांगारी, धारमंडप रस्त्यावर तीन ते चार ठिकाणी मोठमोठ्या दरडी कोसळल्याने रस्त्यावरील वाहतूक बंद आहे. सार्वजनिक बांधकाम विभागा कडुन जेसीबीच्या साह्याने दरडी काढण्याचे काम सुरु आहे. मात्र, पावसाचा जोर जास्त असल्याने सातत्याने दरडी कोसळत असल्याने हा रस्ता वाहतूकीस धोकादायक झाला असून यामुळे वाहतूकीसाठी रस्ता बंद करण्यात आला आहे.
भोर तालुक्यात मागील दोन तीन दिवसांपासुन मुसळधार पाऊस पडत आहे. भोर-महाड रस्त्यावरील हिर्डोशी गावाच्या हद्दीत ३ ठिकाणी तर वारवंड गावाच्या हद्दीत २ ठिकाणी तर शिरगाव आणि वरंध घाटात ७ ठिकाणी दरडी पडल्याने दोन दिवासांपासुन वाहतूक ठप्प झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्ता दुरूस्त करण्याचे काम सुरू आहे. मात्र, गुरूवारी रात्री पुन्हा हिर्डोशी परिसरात ३ ठिकाणी वारवंड गावाच्या हद्दीत २ ठिकाणी तर उंबार्डेवाडी जवळ आणि वरंध घाटात ११ ठिकाणी पुन्हा दरडी कोसळ्याने वाहतूक बंदच आहे.
महाड रस्त्यावरुन धारमंडपमार्गे शिळीब पसुरे जाणाऱ्या रस्त्यावरील अशिपी, कुंड राजिवडी, साळुंगण गावाजवळ डोंगरातील दगड माती झाडे रस्त्यावर येऊन दरड पडल्याने वाहतूक बंद झाली. अशिपी गावाजवळ रस्ता खचल्याने वाहतूक बंद आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जेसीबीच्या मदतीने दरडी झाडेझुडपे काढण्याचे काम सुरु आहे. आंबाडखिंड घाटातही पडलेली दरड काढली आहे. रस्ता वाहतुकीस खुला केला असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता योगेश मेटेकर यांनी सांगितले. पऱ्हर व कुडली या गावाजवळ दरड पडल्याने रस्त्यावरील वाहातुक पुर्णपणे बंद झाली आहे. रस्त्यावरील पडलेली झाडे झुडपे दरडी काढण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. तर धानवली गावाला जाणारा रस्ता खचल्यामुळे येथील वाहातुक बंद झाली आहे. यामुळे लोकांचा संर्पक तुटलेला आहे.