दैनंदिन वापरासाठी पावसाचे पाणी
By admin | Published: June 1, 2016 12:55 AM2016-06-01T00:55:52+5:302016-06-01T00:55:52+5:30
राज्यावर दुष्काळाचे गंभीर सावट असल्याने पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवून त्याचे योग्य प्रकारे नियोजन व्हावे यासाठी ‘लोकमत’चा ‘जलमित्र अभियान’ हा अभिनव उपक्रम राबविला जात आहे
पुणे : राज्यावर दुष्काळाचे गंभीर सावट असल्याने पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवून त्याचे योग्य प्रकारे नियोजन व्हावे यासाठी ‘लोकमत’चा ‘जलमित्र अभियान’ हा अभिनव उपक्रम राबविला जात आहे. या अभियानाला सकारात्मक प्रतिसाद देत पुण्यातील धायरीमधील साईपूरम सोसायटीने या वर्षी जलपुनर्भरण (रेनवॉटर हार्वेस्टिंग ) प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून सोसायटीच्या पाच इमारतींच्या तब्बल ६० हजार चौरसफूट क्षेत्रावर पडणाऱ्या पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे त्यासाठी सोसायटीने तब्बल १५० फूट खोलीची एक बोअरवेल घेतली आहे. याशिवाय हे पाणी सोसायटीत अस्तित्वात असलेला एक बोअर आणि सुमारे २० हजार लिटरच्या साठवणूक टाकीत संकलित करण्यात येणार असून, दैनंदिन वापरासाठी या पाण्याचा उपयोग केला जाणार आहे. सोसायटीने घेतलेल्या पुढाकारामुळे वर्षाला तब्बल ४२ लाख लिटर पाणी भूगर्भात जिरविणे शक्य होणार आहे.
शहरात महापालिकेने २००७ नंतरच्या सर्व इमारतींना रेनवॉटर हार्वेस्टिंगची सक्ती केलेली आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने साईपूरम सोसायटीने यासाठी पुढाकार घेऊन नवीन आदर्श घालून दिला आहे. या धायरी येथे कैलास जीवन फॅक्टरीजवळ असलेल्या या सोसायटीमध्ये सुमारे ५ इमारती असून, प्रत्येक इमारतीचे छत जवळपास १५ हजार चौरस फुटांचे आहे. त्यामुळे या इमारतींवर पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साठते. यापूर्वी हे पाणी सोसायटीकडून परिसरात असलेल्या नाल्यात सोडले जात होते. मात्र, राज्यात दुष्काळाचे सावट असल्याने पाणी बचतीसाठी पुढाकार घेण्याचे तसेच प्रत्येक थेंब वाचविण्याचे आवाहन लोकमतकडून करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत साईपूरम सोसायटीने हा प्रकल्प हाती घेतला आहे. त्यानुसार, या पाच इमारतींमधील पाणी एका स्वतंत्र यंत्रणेद्वारे संकलित करून ते फिल्टरच्या माध्यमातून पुढे सोसायटीच्या दोन बोअरवेल आणि संकलन टाकीत सोडले जाणार आहे. ४२ लाख लिटर पाण्याची बचत
शहरातील पावसाचे प्रमाण लक्षात घेता १ हजार चौरसफूट क्षेत्रात जवळपास ७0 हजार लिटर पाणी रेनवॉटर हार्वेस्टिंगद्वारे भूगर्भात पोहोचविता येते. या सोसायटीच्या पाच इमारतींच्या छताचे क्षेत्रफळ हे तब्बल ६0 हजार चौरसफूट आहे. त्यामुळे सोसायटीकडून जवळपास ४२ लाख लिटर पाणी वाचविले जाणार आहे. शहरातील इतर सोसायट्यांसाठी साईपूरम सोसायटीचा हा उपक्रम निश्चितच एक आदर्श ठरणार आहे.