स्वारगेट बसस्थानक प्रवेशद्वारावरच पावसाच्या पाण्याचे तळे; खड्डे अन् पाणी, ये-जा करताना प्रवाशांना त्रास
By अजित घस्ते | Updated: May 21, 2024 18:44 IST2024-05-21T18:44:20+5:302024-05-21T18:44:47+5:30
दोन दिवसांपासून पाणी जैसे थे असल्याने खड्ड्यामुळे बसला ये-जा करताना अडथळा निर्माण होतोय

स्वारगेट बसस्थानक प्रवेशद्वारावरच पावसाच्या पाण्याचे तळे; खड्डे अन् पाणी, ये-जा करताना प्रवाशांना त्रास
पुणे : स्वारगेट बसस्थानकातून गाडी बाहेर जाणाऱ्या प्रवेशद्वारावरच पावसाचे पाणी साचल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. बसस्थानकातील वाहतुकीच्या रस्त्यात पावसामुळे खड्डे पडून पाणी मोठ्या प्रमाणात साचले असल्याने तळयाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. दोन दिवसांपासून पाणी जैसे थे असल्याने खड्ड्यामुळे बसला ये-जा करताना अडथळा निर्माण होत आहे. तर प्रवाशांना येणे -जाणे अवघड झाले आहे.
स्वारगेट बसस्थानकावरून गाड्या बाहेर पडणा-या गेटमध्येच पाणी साचल्याने खड्डा तयार झालाय. जेटकींन मशिनद्वारे पाणी काढण्याचे काम सुरू आहे. अद्याप पाणी बाहेर गेले नसल्याने दोन दिवसांपासून प्रवाशी हैराण झाले आहेत. याबाबत पुणे विभागीय नियंत्रक प्रमोद नेहूर यांनी येथील पाणी काढण्यासाठी मनपा क्षेत्रिय कार्यालय येथे निवेदन दिले असून मनपा प्रशासनाकडून काम होत नसल्याचे सांगितले.
स्वारगेट एसटी बस स्थानक मध्यवर्ती बस स्थानक असून येथून १० हजार प्रवाशी रोजच्या रोज ये -जा करीत आहेत. त्यात सध्या उन्हाळी सुट्टी असल्याने प्रवासांची संख्या वाढली आहे. मात्र दोन दिवसांपासून येथे पाणी साचले आहे. परंतु ही परिस्थिती अत्यंत धोकादायक आहे. अपघाताचा धोका ओळखून येथील चेंबरची दुरुस्ती त्वरित करण्यात यावी. याबाबत मनपा क्षेत्रीय कार्यालय निवेदन देण्यात आले आहे. अद्याप काम सुरू असल्याने आगारात मात्र पाणी साचल्याने प्रवाशांना वाहनचालकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.