जिल्ह्यात अखेर पावसाला सुरुवात!
By admin | Published: June 20, 2016 01:09 AM2016-06-20T01:09:12+5:302016-06-20T01:09:12+5:30
दहा दिवसांच्या हुलकावणीनंतर अखेर जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून खरिपांच्या पेरण्यांना सुरवात होणार आहे.
बारामती/इंदापूर : दहा दिवसांच्या हुलकावणीनंतर अखेर जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून खरिपांच्या पेरण्यांना सुरवात होणार आहे. सकाळपासून ढगाळ हवामान असल्याने पावसाचे वातावरण तयार झाले होते.
बारामती, इंदापूर, पुरंदर, आंबेगाव तालुक्यात हलक्या सरी बरसल्या. सायंकाळनंतर बारामती आणि इंदापूर तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली हवामान खात्यांच्या अंदाजानंतरही पावसाने हुलकावणी दिली होती. यामुळे पेरण्यासाठी शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होते. अखेर ही प्रतीक्षा संपली. बारामती तालुक्याच्या पश्चिम भागात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. रविवार (दि. १९) दुपारपासून पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या यामुळे खरिपाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. जिरायती भागातील मोरगाव, तरडोली, आंबी, जोगवडी, मोडवे, मुर्टी या भागात दुपारपासून पावसाच्या तुरळक सरी पडत आहेत. हा पाऊस खरीप हंगामातील बाजरी, मूग, मटकी, हुलगा, मका, सूर्यफुलाच्या पेरणीसाठी जरी पोषक नसला, तरी पावसाच्या या हलक्या सरींमुळे खरिपाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यामुळे शेतकरी आनंदात आहे.
बारामती शहर आणि तालुक्यात रविवारी पावसाच्या हलक्या सरी पडल्या. या पावसाने हवेत गारवा निर्माण झाला होता. सायंकाळी पाच वाजता पावसाच्या हलक्या सरी पडल्या. सायंकाळी उशिरापर्यंत आधूनमधून या पावसाच्या सरी पडत होत्या. इंदापूर शहरात दुपारी दोन वाजता दमदार पावसाने हजेरी लावली.
तासभर पडलेल्या या पावसाने आठवडा बाजाराची त्रेधा उडवली. मात्र, या पावसामुळे सर्वच जण सुखावले गेल्याचे चित्र होते. सकाळपासून आभाळ भरून आले होते. वाहती हवा असल्याने दुपारीच पाऊस येईल, असे कुणाला वाटले नव्हते. पावणेदोन वाजण्याच्या सुमारास आभाळात अचानक काळ्या ढगांची दाटी झाली. काही समजण्याच्या आत पाऊस सुरू झाला. रविवारच्या आठवडेबाजाराची त्याने त्रेधा उडवली. भिगवण परिसरातही जवळपास दोन तास पावसाने हजेरी लावली. (वार्ताहर)