पुणेकरांवर पर्जन्य राजा प्रसन्न, पावसाने ओलांडला ६०० मिमीचा पल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 12:42 AM2017-09-19T00:42:23+5:302017-09-19T00:42:25+5:30
दोन वर्षांपूर्वी पाणी टंचाईची झळ सोसणा-या पुणेकरांवर यंदा पर्जन्यराजा अधिकच प्रसन्न झाला असून पावसाळ्यात पडणा-या पावसापेक्षा तब्बल १३०़८ मिमी जादा पाऊस आतापर्यंत झाला आहे़
पुणे : दोन वर्षांपूर्वी पाणी टंचाईची झळ सोसणा-या पुणेकरांवर यंदा पर्जन्यराजा अधिकच प्रसन्न झाला असून पावसाळ्यात पडणा-या पावसापेक्षा तब्बल १३०़८ मिमी जादा पाऊस आतापर्यंत झाला आहे़ शहरातील पावसाने ६०० मिमीचा पल्ला ओलांडला असून अजून पावसाळ्याचे जवळपास १२ दिवस बाकी आहेत़ पुणे शहराची वार्षिक सरासरी ७४० मिमी इतकी असून आतापर्यंत ६२१ मिमी पावसाची नोंद झाली आहे़ हा पाऊस सरासरीपेक्षा १३़८ मिमीने जास्त आहे़
यंदा मान्सून नेहमीपेक्षा थोडा उशिरा आला असला तरी जूनमध्ये तो धो धो कोसळला़ जूनच्या शेवटचे काही दिवस तसेच जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाने ओढ दिली होती़ त्यानंतर पुन्हा एकदा पाऊस बरसू लागला़ जुलै महिन्यात पावसामध्ये सातत्य राहिले़ जुलै महिन्यात १९४़२ मिमी पावसाची नोंद झाली होती़ पुणे शहराला पाणी पुरवठा करणा-या खडकवासला धरण साखळीमधील चारही धरणातील पाणीसाठा ९० टक्क्यांच्या पुढे गेल्याने नदीतून पाणी सोडण्याची वेळ आली होती़
बंगालच्या उपसागरात सातत्याने निर्माण झालेले कमी दाबाचे पट्टे आणि त्याच्या जोडीला अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा यामुळे पुण्यासह राज्यात अनेक ठिकाणी सप्टेबर महिन्यातही चांगला पाऊस होत आहे़ सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून कोकण ते केरळपर्यंत हवेच्या दाबाचे कुंड तयार झाले आहे़ त्यामुळे पुढील काही दिवस कोकणासह मध्य महाराष्ट्र तसेच पुणे परिसरात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे़ त्यामुळे पुढील काही दिवसात पुणे शहराची वार्षिक सरासरी पूर्ण केली जाऊ शकेल़
>शहराच्या अनेक भागात सध्या पाऊस पडत असला तरी हवामान विभागाच्या शिवाजीनगर येथील निरीक्षक केंद्रात पडलेला पावसाचीच मोजणी होते़ त्यामुळे तेथे पडलेला पाऊस हा शहराचा पाऊस गृहीत धरला जातो़
>या वर्षीचा पाऊस (मिमी)
जून २०७़८
जुलै १९४़२
आॅगस्ट १६२़२
१८ सप्टेंबरपर्यंत ५७़१