स्मार्ट सिटीचे पावसाळ्यात तीन तेरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 02:13 AM2018-07-13T02:13:08+5:302018-07-13T02:13:45+5:30
बाणेर हा भाग स्मार्ट सिटीमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. पावसाळ्यामध्ये सर्वच पायाभूत सुविधांचा कस लागत असतो. त्यामुळे स्मार्टसिटीच्या या भागाच्या पायाभूत सुविधेचे धिंडवडे पहिल्याच पावसात निघालेले निदर्शनास आले आहे.
पुणे - बाणेर हा भाग स्मार्ट सिटीमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. पावसाळ्यामध्ये सर्वच पायाभूत सुविधांचा कस लागत असतो. त्यामुळे स्मार्टसिटीच्या या भागाच्या पायाभूत सुविधेचे धिंडवडे पहिल्याच पावसात निघालेले निदर्शनास आले आहे. जागोजागी साचलेले कचऱ्यांचे ढिग, चौकाचौकात साचलेले पाणी, सार्वजनिक शौचालयांचा अभाव, तुंबलेले रस्ते, पाहिल्यानंतर या शहराला स्मार्ट सिटी कसे म्हणायचे, असा प्रश्न पडतो.
रामभाऊ पारखे चौकातील सर्व दुभाजक उद्ध्वस्त झाले आहेत. तसेच पुढे गेल्यानंतर नाल्यावरची कचराकुंडीतील कचरा उचलला न गेल्यामुळे ओसांडून वाहताना दिसतात.
स्मशानभूमीकडे बाबूराव मुरकुटे मार्गावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेले दिसत आहे. विद्यापीठ रस्ता ते बाणेर या चार ते पाच किमीच्या रस्त्यावर एका ठिकाणीदेखील सार्वजनिक स्वच्छतागृह नाही.
या रस्त्यावर अनेक संशोधनसंस्था आहेत. त्यांच्या भिंतीवर स्वच्छ भारत योजनेची घोषवाक्ये रंगवली आहेत. या घोषणांवरच नागरिक लघुशंका करताना आढळून येतात.
पदपथाला लागून असलेले मोकळ्या फ्युज बॉक्समुळे व त्याच्याच बाजूला असलेले बसथांब्यांमुळे नागरिकांचे जीवन स्मार्ट सिटीमध्ये कितपत सुरक्षित आहे, हा मुद्दाच आहे.
रस्त्याच्या बाजूला असलेले पदपथ खचलेले आहेत. रस्त्यांचे दुभाजक उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे वाहतुकीचे मोठे प्रमाण असलेल्या या भागामध्ये अनेकदा अपघात झाले आहेत. ज्यामध्ये निष्पाप महिला व मुलांना आपला जीव गमवावा लागला आहे.
१३ कोटी वृक्ष लागवडीचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून सगळीकडे झाडे लावली आहेत. परंतु, त्यांना संरक्षक जाळ्या नाहीत. त्यामुळे फक्त वृक्षारोपणाचे सोपस्कार पूर्ण केले गेले आहेत. पदपथ व रस्ता यांच्या मधोमध काही ठिकाणी झाडे लावण्यात आली आहे. गाडी पार्क करताना या नवीन लागवड झालेल्या झाडांचे जीवन हमखास संपणार, हे निश्चित आहे. त्यामुळे ही झाडे काही महिनेदेखील जगणार नाहीत.
सिंध सोसायटीचा परिसर हा उच्चभ्रू परिसर म्हणून गणला जातो. त्या सोसायटीच्या बाहेरच कचºयाचे ढिगारे पडलेले दिंसतात. या ठिकाणी येणारे जाणे लघुशंका करताना आढळून येतात.
बाणेर चौकामध्ये थोडाजरी पाऊस झाला तरी पाणी साचून राहते. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता अधिक आहे.
ज्या ठिकाणी कचरा टाकू नये. कचरा टाकल्यास कार्यवाही केली जाईल, अशी पाटी आहे. अशा जागेवरच कचरा टाकला जात असल्याचे निदर्शनाच आले आहे.