Monsoon : हवामान विभागाचा सुखद सांगावा, मान्सून यंदा ९९ टक्के बरसणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 11:00 AM2022-04-15T11:00:00+5:302022-04-15T11:00:02+5:30

यंदाही मान्सून सरासरीच्या ९९ टक्के पडण्याची शक्यता

rainy season weather monsoon will rain 99 percent this year 2022 in india | Monsoon : हवामान विभागाचा सुखद सांगावा, मान्सून यंदा ९९ टक्के बरसणार

Monsoon : हवामान विभागाचा सुखद सांगावा, मान्सून यंदा ९९ टक्के बरसणार

googlenewsNext

पुणे : भारतीय हवामान विभागाने आज सुखद सांगावा धाडला. गेल्या काही वर्षांप्रमाणे यंदाही मान्सून समाधानकारक होणार असून, तो सरासरीच्या ९९ टक्के पडण्याची शक्यता आहे. २०२० मधील पावसाच्या दीर्घकालीन अंदाजानुसार सरासरीच्या ९९ टक्के पाऊस होण्याचा अंदाज आहे. तो सामान्यतः ९६ ते १०४ टक्के राहील, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

१९७१-२०२० या कालावधीत संपूर्ण देशात मान्सून हंगामातील पावसाची दीर्घकालीन सरासरी ८७ सेमी एवढी आहे. प्रशांत महासागराच्या विषवृत्तीय भागात ला निना परिस्थिती आहे. ला निनाची स्थिती पावसाळ्यात कायम राहण्याची शक्यता आहे.

यंदा उन्हाळा अति तीव्रतेने जाणवत असल्याने मान्सून कसा राहील, याविषयी सर्वांनाच उत्सुकता असल्याचे सांगून महापात्रा म्हणाले, यंदा देशात सर्वदूर ९९ टक्के पाऊस पडेल. मात्र पूर्वेत्तर राज्यात तो सरासरीपेक्षा कमी पडेल तर राजस्थान, बिहार, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, गुजरात, महाराष्ट्र या राज्यात तो सरासरीपेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे. मान्सून नेमका कधी येईल याबाबत महापत्रा यांनी सांगितले की, मान्सून केरळात नेमका कधी येईल ते आत्ताच सांगता येणार नाही. आम्ही १५ मे रोजी ती तारीख जाहीर करणार आहोत.

ला नीना आणि आयओडी स्थिती चांगली

महापात्रा यांनी सांगितले की, यंदा व व भारतीय समुद्री स्थिरांक (आयओडी) ची स्थिती सकारात्मक असून असल्याने देशात पाऊस चांगला होईल. मात्र ऑगस्ट नंतर ला नीना तटस्थ होणार आहे. त्या पुढची स्थिती आम्ही दर महिन्याला सांगणार आहोत. जास्त तापमान किंवा कमी तापमानाचा मान्सूनची थेट संबंध नाही. १९७१ ते २०२० इतक्या वर्षातील पावसाच्या आकडेवारीवर यंदाचा अंदाज आम्ही दिला आहे.

महाराष्ट्रात अधिक बरसणार

महाराष्ट्रातील सर्व भागात यंदा सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मराठवाड्याच्या दक्षिणेकडील भागात सरासरीच्या ११० टक्क्यांहून अधिक पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्याचवेळी नगर व परिसरात काही ठिकाणी सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याचा अंदाज आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भात अधिक पावसाची शक्यता आहे.

Web Title: rainy season weather monsoon will rain 99 percent this year 2022 in india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.