पुणे-नगर मार्गावरील पावसाळ्यातील वाहतूककोंडी टळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:13 AM2021-04-30T04:13:53+5:302021-04-30T04:13:53+5:30
कोरेगाव भीमा: पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमा (ता.शिरूर) येथील पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर साचून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते. ...
कोरेगाव भीमा: पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमा (ता.शिरूर) येथील पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर साचून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते. दोन वर्षांपासून पावसाळ्यात वाहतूककोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे आमदार अॅड. अशोक पवार यांनी पुढाकार घेत कोरेगाव भीमाचा सुमारे तीनशे मीटर लांबीच्या भूमीगत गटाराचा प्रश्न निकाली काढला आहे.
कोरेगाव भीमा येथील अनेक ठिकाणी ओढे-नाल्यांवर करण्यात आलेल्या अतिक्रमणांमुळे गेल्या दोन वर्षांपासून पावसाळ्यात महामार्गावरून प्रवास करणे जिकिरीचे ठरत होते. स्टेट बँकेपासून शेजारील ओढा बुजला असल्याने तेथीलही पावसाचे पाणी मुख्य चौकाकडे येत होते. अनेक ठिकाणी घरे, शेतातील पिके पाण्याखाली गेली होती. त्यातून मार्ग काढण्यासाठी प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी प्रयत्न केले होते. मात्र अद्याप तेथील अतिक्रमण काढण्यास यश आले नव्हते. त्यामुळे यावर्षीही पावसाळ्यात मुख्य चौकातील महामार्ग पाण्याखाली जाणार का? असा सवाल उपस्थित झाला होता.
याबाबत कोरेगाव भीमाचे सरपंच अमोल गव्हाणे, माजी सरपंच संदीप ढेरंगे, ग्रामपंचायत सदस्य केशव फडतरे , विक्रम गव्हाणे , सामाजिक कार्यकर्ते संपत गव्हाणे, ग्रामविकास अधिकारी गुलाबराव नवले यांच्या शिष्टमंडळाने आमदार अॅड. अशोक पवार, बाजार समितीचे संचालक आबाराजे मांढरे, जिल्हा नियोजन समितीचे पंडित दरेकर यांच्या समवेत बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई यांच्याकडे कोरेगाव भीमातील पावसाळयातील पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली. त्यानुसार आमदार अॅड. अशोक पवार यांनी कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई यांना कोरेगाव भीमातील भूमिगत गटाराचा प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना करताच बाराशे मिलिमीटर व्यासाच्या सुमारे तीनशे मीटर लांबीपर्यंत दोन नलिकांच्या कामास तत्काळ मंजुरी देत हा प्रलंबित प्रश्न सोडविण्यात आला असून प्रत्यक्ष कामासही सुरुवात झाल्याने कोरेगाव भीमाचा पावसाळ्यातील महामार्गाचा प्रश्न पावसाळ्याआधी सुटणार आहे.
रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूककोंडी होत असते. दोन वर्षापासून ही समस्या होती. आता या ठिकाणी भूमिगत गटर लाईन तसेच पाणी साचणाऱ्या भागातील रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम तत्काळ सुरु करण्याची आले आहे. त्यामुळे वाहतूककोंडीची समस्या दूर होईल.
ॲड. अशोक पवार आमदार
पावसाळ्यात महामार्गावर पाणी साचत असल्याने महिनाभर वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत होते. तसेच मुख्य रस्त्यालगत खोदकाम केल्याचा फटका व्यापारी वर्गासाह नागरिकांनाही बसत होता. आमदार अशोक पवार यांच्या पुढाकाराने या समस्येचा निपटारा झाला आहे. दरम्यान, कोरोनामुळे ग्रामपंचायतींना एवढा मोठा खर्च करणे जिकिरीचे ठरणार होती. त्यामुळे आमदार पवार यांनी सुमारे तीनशे मीटर बाराशे व्यासाच्या दोन नलिकांचे काम केल्याने मोठी समस्या सुटली आहे.
अमोल गव्हाणे, सरपंच.
२९ कोरेगाव भीमा
कोरेगाव भीमा (ता.शिरुर) येथील पावसाळ्यातील महामार्ग पाण्यात जाण्याची समस्या सोडविण्यासाठी प्रत्यक्ष कामास सुरुवात होत कामाची पाहणी करताना सरपंच अमोल गव्हाणे सह इतर पदाधिकारी.