मावळातील मल्लविद्येला उभारी

By admin | Published: May 1, 2017 02:44 AM2017-05-01T02:44:45+5:302017-05-01T02:44:45+5:30

सोमाटणे येथील गुरुकुल कुस्ती संकुलात शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत कुस्ती प्रशिक्षणाचे उन्हाळी शिबिराचे आयोजन

Raise the Mallavide Mallavidya | मावळातील मल्लविद्येला उभारी

मावळातील मल्लविद्येला उभारी

Next

शिरगाव : सोमाटणे येथील गुरुकुल कुस्ती संकुलात शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत कुस्ती प्रशिक्षणाचे उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मावळ व मुळशी तालुक्यातील ११ वर्षे वयावरील शंभरपेक्षा जास्त विद्यार्थी या निवासी प्रशिक्षण शिबिरात सहभागी झाले आहेत. या संकुलामुळे मावळ तालुक्यातील लोप पावत चाललेल्या मल्लविद्येला उभारी मिळत आहेत.
रेल्वेत नोकरीस असलेले आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर शंकर कंधारे यांनी मावळ व मुळशी तालुक्यातील तरुणांच्या कुस्ती प्रशिक्षणासाठी पुढाकार घेत चार वर्षांपूर्वी सुरुवात करून सोमाटणे येथील चौराई देवीच्या डोंगराच्या कुशीत पदरमोड करून चौदा गुंठे जागेत कुस्ती संकुल बांधले. त्यात गादी व मातीवरील कुस्ती आखाडे, व्यायामशाळा तसेच निवासाची सोय केली आहे. केवळ कुस्तीगीरांना विनामूल्य प्रशिक्षण मिळण्यासाठी गुरुकुल कुस्ती संकुलाची निर्मिती केली असल्याचे कंधारे यांनी सांगितले. दर वर्षी या संकुलात उन्हाळी व दिवाळी सुटीत विद्यार्थ्यांना मोफत कुस्ती प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे मावळत कुस्तीगीरांची संख्या दुप्पट वाढली आहे.
कंधारे हे आपल्या सरकारी नौकरीचा व्याप सांभाळून प्रशिक्षण देत आहेत. मागील काळात मावळातील गावागावांमध्ये कुस्तीला खूप महत्त्व होते. त्यामुळे अनेक नामवंत पैलवान मावळ तालुक्यातून तयार झाले. पण, काळाच्या ओघात मावळात वेगाने बदलाचे वारे वाहू लागले. मावळातील जमिनीला सोन्याचे भाव आले. मावळातही शहरीकरणाचे वारे वाहू लागल्याने येथील अनेक शेतकऱ्यांनी जमिनी विकण्याचा सपाटा सुरू केला. यातूनच कुस्ती हा खेळ मागे पडू लागला. तरुणवर्गही यापासून चार हात लांबच राहू लागले. पण, आता गुरुकुल कुस्ती संकुलामुळे पुन्हा एकदा येथील तरुण कुस्तीकडे आकर्षित झाला आहे. मावळातील बरेच तरुण कुस्तीकडे वळताना दिसत आहेत. त्यामुळे मावळातील कुस्तीगीरांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे.
संकुलात विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे गादी व मातीवरील कुस्तीचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांकडून भरपूर सराव करून घेतला जातो. पाहटे विद्यार्थ्यांना धावणे, व्यायामाबरोबरच एकाग्रता वाढविण्यासाठी योगासने शिकविली जातात. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन व विविध भरती बाबतचे प्रशिक्षणही देण्यात येत असल्याची माहिती कंधारे यांनी दिली. विद्यार्थ्यांची शिस्त वाखण्याजोगी असून, त्यांना उत्तम संस्काराचेही धडे दिले जात आहेत. खंडू वाळुंज, मुरली गराडे, प्रशिक्षक संजय दाभाडे व एनआयएस कुस्ती प्रशिक्षक सूर्यकांत जाधव यांचेही सहकार्य गुरुकुल कुस्ती संकुलास लाभत आहे. (प्रतिनिधी)

विद्यार्थ्यांची चमक : आखाड्यातून लौकिक

गुरुकुलाच्या लाल मातीत कुस्ती सराव करून अनेक नामवंत पैलवान तयार झाले असून, सध्या हे पैलवान वेगवेगळ्या स्पर्धेत आपला ठसा उमटवत आहेत. मावळात सध्या यात्रांचे दिवस सुरू असल्याने गावागावांत यात्रेनिमित्त कुस्तीचे आखाडे भरविण्यात येत आहेत. त्यातही येथील विद्यार्थी चमकदार कामगिरी करीत नावलौकिक मिळवत आहेत.
आजपर्यंत गुरुकुलातील अनेक विद्यार्थ्यांनी विविध शालेय पातळीवरील, राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्पर्धेत पारितोषिकेही प्राप्त केली असून, गुरुकुलसह मावळ तालुका, पुणे जिल्हा व राज्याचे नाव मोठे केले आहे. यामध्ये आकाश नांगरे, अतिष आडकर, अक्षय जाधव, रत्नेश बोरगे, पार्थ कंधारे, अनिकेत मगर, भानुदास घारे, ओंकार शिंदे, पृथ्वी भोईर, रोहन लिमण, सैफी पठाण, प्रतीक येवले आदी प्रशिक्षणार्थी मल्ल सध्या मैदान गाजवत आहेत.

Web Title: Raise the Mallavide Mallavidya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.