'आवाज वाढवं डीजे...' आता नको रे बाबा! कर्णकर्कश आवाजाने नागरिकांच्या शरीरावर घातक परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2024 13:54 IST2024-09-19T13:53:48+5:302024-09-19T13:54:03+5:30
विशेषत: २० ते ३० वयाेगटातील तरुणाईला मळमळ हाेणे, चक्कर येणे, डोके दुखणे, ब्लड प्रेशर वाढणे अशा समस्यांना सामोरे जावे लागले

'आवाज वाढवं डीजे...' आता नको रे बाबा! कर्णकर्कश आवाजाने नागरिकांच्या शरीरावर घातक परिणाम
पुणे: डीजेमध्ये वाजल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या कर्कश आवाजामुळे विसर्जन मिरवणुकीत भाविकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. विशेषत: २० ते ३० वयाेगटातील तरुणाईला डीजेच्या आवाजाचा सर्वाधिक त्रास झाल्याचे डाॅक्टरांचे म्हणणे आहे. यामध्ये मळमळ हाेणे, चक्कर येणे, डोके दुखणे, ब्लड प्रेशर वाढणे, धडधड होणे, घाम येणे, कानामध्ये सतत कुईकुई आवाज होणे अशा समस्यांना सामाेरे जावे लागले.
यामुळे तात्पुरते किंवा कायमचा कानाचा आवाज बंद होणे आणि ज्येष्ठ नागरिकांना आवाजामुळे धक्का बसणे अशा अनेक समस्या डीजेमध्ये वाजल्या जाणाऱ्या कर्कश आवाजामुळे झाल्याचे पाहायला मिळाले. डीजेमध्ये वेगवेगळ्या मोठ्या आवाजाचा प्रेशर मीड उपकरणाचा वापर केला जातो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ध्वनिप्रदूषण होत असते. ज्याच्यामुळे सामान्य नागरिकांच्या शरीरावर घातक परिणाम होत आहे.
२० ते ३० वयोगटातील तरुण मुला-मुलींना डीजेच्या या कर्कश आवाजाचा सर्वाधिक त्रास होत असतो. सतत डीजेच्या संपर्कात असल्यामुळे (रिंगिंग साउंड), सतत कुईकुई आवाज येणे, मळमळ हाेणे, चक्कर येणे, ब्लडप्रेशर वाढणे, धडधड होणे, अधिक घाम येणे असे अन्य प्रकारचे त्रासदेखील होत असतात. - डॉ. गौरी बेलसारे, कान-नाक-घसा तज्ज्ञ
डीजेच्या आवाजामुळे गर्भवती स्त्रियांना अनेक प्रकारचे त्रास होऊ शकतात. अशा वेळेस स्त्रियांनी डीजेच्या आवाजापासून लांब राहणे खूप गरजेचे आहे. गर्भामध्ये असलेल्या बाळाला डीजेच्या आवाजामुळे धक्का बसू शकतो, ज्याच्यामुळे बाळाची हालचाल वाढू शकते. त्यामुळे आईला धडकी भरण्याची शक्यता असते. - डॉ. शमीप भुजबल, स्त्रीराेगतज्ज्ञ