ड्युटीवरील पोलिसावरच उचलला हात! आरोपींची रवानगी थेट तुरुंगात, सिंहगड रस्त्यावरील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2024 14:34 IST2024-07-10T14:32:47+5:302024-07-10T14:34:55+5:30
दोन जणांनी ड्युटीवर असलेल्या पोलिसालाच मारहाण केल्याची घटना घडली. यावरून कायद्याचे रक्षकही सुरक्षित नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे

ड्युटीवरील पोलिसावरच उचलला हात! आरोपींची रवानगी थेट तुरुंगात, सिंहगड रस्त्यावरील घटना
धायरी : पुणे शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढतच आहे. परिणामी नागरिक धास्तावले असून, अक्षरशः जीव मुठीत धरून जगत आहेत. त्यातच सिंहगड रस्त्यावरील कोल्हेवाडी फाटा येथे दोन जणांनी ड्युटीवर असलेल्या पोलिसालाच मारहाण केल्याची घटना घडली. यावरून कायद्याचे रक्षकही सुरक्षित नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
याप्रकरणी मंगेश शिवाजी फडके (वय ३४, हेवन पार्क, महंमदवाडी, हडपसर) व बापू रोहिदास दळवी (४५, शेल पेट्रोल पंपाशेजारी, महंमदवाडी) यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १२१ (१), १३२, ३५१ (२) ३५१ (३), ३५२ नुसार हवेली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहितीनुसार, सिंहगड रस्ता परिसरामध्ये कोल्हेवाडी शिवनगर रस्ता करण्यासाठी ठेकेदाराला टेंडर पारित करण्यात आले आहे. पावसाळ्याच्या तोंडावर अर्धवट स्थितीत काम रखडल्याने येथे रोज वाहतूक कोंडी होते. दरम्यान, रविवारी वाहतूक कोंडी हटविण्यासाठी पोलिस अंमलदार ऋषिकेश गायकवाड व आर. सी. फडतरे हे नेमणुकीस होते. दुपारी तीनच्या सुमारास एक कार भरधाव येत असल्याचे पाहून पोलिस अंमलदार ऋषिकेश गायकवाड यांनी ती कार थांबवून रस्त्याच्या बाजूला घेण्यास सांगितले. त्यावेळी कारचालक मंगेश फडके याने अरेरावी सुरू केली व कार बाजूला घेण्यास नकार दिला.
मंगेश फडके हा कार तशीच रस्त्यावर उभी ठेऊन उतरला व ‘मी कोण आहे तुला माहीत नाही. तू नोकरी कशी करतो तेच बघतो’ असे म्हणत पोलिस अंमलदार ऋषिकेश गायकवाड यांना शिवीगाळ करत मारहाण सुरू केली. त्यावेळी दुसरे पोलिस अंमलदार आर. सी. फडतरे हे गायकवाड यांच्या मदतीसाठी धावले. तेव्हा कारमध्ये बसलेला बापू रोहिदास दळवी हा कारमधून उतरला आणि त्यानेही पोलिसांना मारहाण केली. पुढील तपास हवेली पोलिस करीत आहेत.