कृत्रिम बुद्धिमत्ता विकास केंद्रासाठी पुण्यातील 'रायसोनी इन्स्टिटयूट'ची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 05:54 PM2018-06-13T17:54:04+5:302018-06-13T17:56:16+5:30
कृत्रिम बुद्धिमत्ता विकास केंद्रासाठी पुण्यातील 'रायसोनी इन्स्टिटयूट'ची 'झोनल लीड पार्टनर' म्हणून एनव्हीडीया आणि बेनेट विद्यापीठाच्या 'लीडइंडिया' या संयुक्त प्रकल्पांतर्गत निवड झाली आहे.
पुणे : औद्योगिक, शैक्षणिक, शेती व वाहतूक क्षेत्रातील उत्पादनाच्या गुणवत्ता वाढीसाठी कृत्रिम बुद्धिमता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) आणि डीप लर्निंग तंत्रज्ञानाचा उपयोग होतो. हे तंत्रज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी वाघोली येथील जी. एच. रायसोनी इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटची 'झोनल लीड पार्टनर' म्हणून एनव्हीडीया आणि बेनेट विद्यापीठाच्या 'लीडइंडिया' या संयुक्त प्रकल्पांतर्गत निवड झाली आहे. प्रकल्पांतर्गत नुकतेच कृत्रिम बुद्धिमतेवर कार्यशाळेचे आयोजन केले होते. कमिन्स इंडियाचे ग्लोबल हेड व वरिष्ठ महाव्यवस्थापक डॉ. प्रदीप चटर्जी यांनी मार्गदर्शन केले.
या प्रकल्पामध्ये इंग्लंडमधील रॉयल अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग,युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन आणि ब्रुनेल युनिव्हर्सिटी लंडन यांचा सहभाग, तर ऍमेझॉन, ईडीएक्स, व्हिडीओकॉन आणि न्यूट-भाभा फंड यांचे या प्रकल्पाला सहकार्य लाभलेले आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डीप लर्निंग हे औद्योगिक ४.० क्रांतीची ओळख आहे. या प्रकल्पाचा उद्देश भारतातील शैक्षणिक संस्थांना डीप लर्निंग आणि कृत्रिम बुद्धिमत्ता कौशल्याला मुख्य प्रवाहात आणणे आहे. या प्रकल्पाद्वारे शिक्षक व विद्यार्थ्यांना प्रक्षिक्षण देण्यात येईल. तसेच अभ्यासक्रमातील बदल व संशोधन करण्यासाठी प्रकल्पाची मदत होईल.
या प्रकल्पात उद्योगांचा सहभाग असल्याने शिक्षक व विद्यार्थ्यांना औद्योगिक उपक्रमांत सहभागी होण्याची व स्वतःचा स्टार्टअप चालू करण्याची संधी प्राप्त होणार आहे. बेनेट विद्यापीठाने नुकत्याच आयोजित केलेल्या स्टार्टअपवरील परिसंवादात रायसोनी इन्स्टिट्यूटचे प्राचार्य डॉ. आर. डी. खराडकर यांनी भाग घेतला होता. नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत, कृत्रिम बुद्धिमत्ता राष्ट्रीय समिती प्रमुख डॉ. पुष्पक भट्टाचार्य यांनी परिसंवादात मार्गदर्शन केले. या केंद्राच्या स्थापनेसाठी रायसोनी समूह संस्थेचे अध्यक्ष सुनील रायसोनी, संचालक अजित टाटीया यांनी पुढाकार घेतला आहे.