राज कपूर गुरू नव्हे, अभिनयाची इन्स्टिट्यूट : ॠषी कपूर यांचे ‘पिफ’मध्ये भावोद्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 05:28 PM2018-01-13T17:28:58+5:302018-01-13T17:31:15+5:30
राज कपूर हे माझे केवळ गुरूच नव्हते तर ती अभिनयाची मोठी इन्स्टिट्यूट होती, अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेते ॠषी कपूर यांनी ‘शोमॅन’ राज कपूर यांच्याविषयी भावोद्गार काढले.
पुणे : ‘बॉबी’हा तरूणवयातला पहिलाच चित्रपट. ‘मैं शायर तो नहीं’ हे गाणं शूट होणार होतं..मला नृत्य येत नसल्यानं कोणीतरी नृत्यदिग्दर्शक असेल आणि तो मला नृत्य करायला शिकवेल, या भ्रमात होतो. ’सहाब’ (राज कपूर) सेटवर आले. इतरांप्रमाणेच मीही त्यांना हेच संबोधित होतो. माझं पहिलं गाणं आणि नृत्यदिग्दर्शक नाही असं त्यांना म्हटलं. तेव्हा त्यांनी एका झटक्यात माझ्या भ्रमाचा भोपळा फोडला. राज कपूरचा मुलगा कुणाची कॉपी करतो असा ठपका लावून घ्यायचा आहे का? अशी कानउघाडणी करीत मला खोल समुद्रात ढकलून दिलं आणि आता पाय मारायला शिक असं सांगितलं.. तो अभिनयाचा पहिला धडा मिळाला.. राज कपूर हे माझे केवळ गुरूच नव्हते तर ती अभिनयाची मोठी इन्स्टिट्यूट होती, अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेते ॠषी कपूर यांनी ‘शोमॅन’ राज कपूर यांच्याविषयी भावोद्गार काढले.
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतर्गत पिफ फोरमध्ये ‘काँट्रीब्यूशन आॅफ अॅन अॅक्टर इन सिनेमा’ ॠषी कपूर यांच्या गप्पांचा कार्यक्रम रंगला. पिफचे संयोजक डॉ. जब्बार पटेल यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
मी अभिनयातला काही चॅम्पियन नाही मी एक छोटासा अभिनेता आहे. अभिनयाची पाळमुळ ही रक्तातच आहेत. भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये कपूर कुटुंबीयांचे योगदान ९० वर्षांपेक्षा अधिक आहे. अभिनयाचा वारसा असलेल्या कुटुंबात जन्म झाला याचाच अभिमान आहे. कपूर घराण्यात जन्माला आल्यामुळे तुम्हाला एक विशेष ओळख मिळते, पण त्याच वेळी तुमच्या खांद्यावर अपेक्षांचे मोठे ओझे आणि जबाबदारी असते. चित्रपटसृष्टीत घराणेशाही आहे, असे म्हटले जाते, परंतु माझ्या मते ते खरे नाही. रणबीर कपूर, करीना कपूर यांचे पहिले सिनेमे तिकीट खिडकीवर चालले नाहीत, पण तुमच्यात अभिनयाचे गुण असतील तर तुम्ही यशस्वी होताच. कोणताही अभिनेता प्रेक्षकांच्या माथी मारता येत नाही. अभिनेते आणि राजकारणी हे लोक स्वत:च निवडतात. कारण शेवटी कुणाला स्वीकारायचे हे प्रेक्षकांच्या हातात आहे, असे सांगून चित्रपटसृष्टीतील घराणेशाहीवर टीका करणा-यांची तोंड त्यांनी गप्प केली.
अभिनेता हा चांगला का वाईट यात काहीच तथ्य नसते. अभिनेत्यांचे ‘अॅक्टर’ आणि ‘नॉन अॅक्टर’ एवढे दोनच प्रकार असतात. जो मुळात अभिनेता नाहीच तो केवळ ‘पोस्टमॅन’सारखे दिग्दर्शकाने सांगितलेले काम स्वत: चे काहीही न देता पडद्यावर दाखवतो. मला माझ्या अभिनयाच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीमध्ये ख-या अर्थाने अभिनय करण्याची संधीच मिळाली नाही. तुम जर्सी पहनो, गाना गाओ और स्वित्झरलँडमध्ये हिरोईन के पीछे भागो, असे मला सांगितले जायचे. आता माझ्या ‘सेकंड इनिंग’मध्ये मला चांगल्या भूमिका मिळू लागल्या आहेत. त्यामुळे आता मी मजा घेऊन काम करतो, अशी प्रांजळ कबुली ॠषी कपूर यांनी दिली.
अभिनय हा इन्स्टिट्यूटमध्ये शिकून किंवा नैर्सगिक अशा दोन पद्धतीने साकारता येऊ शकतो. अभिनेत्याने ठरवायचे असते आपण कशा पद्धतीने अभिनय करायचा आहे. कोणत्याही भूमिकेसाठी तयारीची विशेष गरज असतेच असे नाही. अभिनय हा नैसर्गिकच असला पाहिजे. कारण अभिनेता हा घडवता येत नाही, अभिनय अंगभूत असावा लागतो याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
जुन्या चित्रपटांचे रिमिक करू नयेत
एकदा बिकानेरमध्ये शूटिंग करीत असताना मनमोहन सिंग यांचा फोन आला. अमर अकबर अँथनी चित्रपटासाठी ‘अकबर’च्या भूमिकेची आॅफर त्यांनी मला दिली. पण आजोबा पृथ्वीराज कपूर यांनी ‘मुघल ए आझम’मध्ये केलेली अकबराची भूमिका अजरामर ठरली आहे. ती भूमिका मी कशी काय करू शकतो? अशी एक भावना मनात आली. पण तो थोडा ऐकण्यात गोंधळ झाला होता, अशी मिश्किल आठवण सांगत ॠषी कपूर यांनी विशिष्ट जुन्या चित्रपटांची एक प्रतिमा लोकांच्या मनात असल्यामुळे त्या चित्रपटांचे ‘रिमेक’ करण्याच्या भानगडीत पडू नये. आम्ही देखील कधी असा विचार कधी केला नाही अशी स्पष्टोक्ती दिली.
आजच्या गाण्यातले शब्दच कळत नाहीत
गाणी हा चित्रपटांचा श्वास आहेत. पूर्वीची गाणी आजही ओठांवर रूंजी घालतात. गाण्यांशी लगेच कनेक्ट व्हायला होते. मात्र सध्याचा संगीताचा काळ समजतच नाही. आजच्या गाण्यात शब्द नसतात, असले तरी ते कळत नाहीत. संगीतही खूप कर्णकर्कश्य वाटणारे असते, अशा शब्दातं त्यांनी गीतकारांना टीकेचे लक्ष्य केले.