Raj Thackarey: मला लवंडेंबद्दल फार बोलायचं नाही, राज ठाकरेंनी राऊतांना हलक्यातच काढलं
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2022 02:23 PM2022-04-17T14:23:24+5:302022-04-17T14:24:43+5:30
राज ठाकरेंनी पुण्यातील पत्रकार परिषदेतून दोन महत्त्वाच्या घोषणा केल्या.
मुंबई - मनेसप्रमुख राज ठाकरे यांनी ठाण्यातील उत्तर सभेतून पुन्हा एकदा मशिदींवरील भोंग्याचा राग आवळला. 3 मेपर्यंत हे भोंगे उतरविण्यासाठी त्यांनी जाहीर सभेतून इशाराही दिला आहे. तसेच, राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांवरही त्यांनी जोरदार प्रहार केला होता. त्यानतंर, राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं राज ठाकरेंवर पलटवार केला. संजय राऊत यांनी त्यांना हिंदु औवेसी असं म्हटलं होतं. राज यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन दोन महत्त्वाच्या घोषणा केल्या. तसेच, संजय राऊत यांना हलक्यात काढल्याचंही दिसून आलं.
राज ठाकरेंनी पुण्यातील पत्रकार परिषदेतून दोन महत्त्वाच्या घोषणा केल्या. 1 मे रोजी औरंगाबादेत जाहीर सभा घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तर, 5 जून रोजी अयोध्येचा दौरा असल्याचेही जाहीर केलं. त्यानंतर, जर आमच्या मिरवणुकांवर कोणी दगडफेक केली, तर आम्हीही शांत बसणार नाही. आमचे हात बांधलेले नाहीत, अशा शब्दात त्यांनी थेट इशाराच दिला आहे. तसेच, संजय राऊत यांनी केलेल्या टिकेसंदर्भात प्रश्न विचारला असता, त्यांनी फार बोलायचं नाही, असं सांगितलं.
''मला लवंडेंबद्दल आता फार काही बोलायचं, असे म्हणत राज ठाकरेंनी संजय राऊत यांना हलक्यातच काढल्याचं दिसून आलं. राज ठाकरेंना अयोध्येला जाण्याचा आपला उद्देश काय, असं विचारलं असता, बरेच दिवस झालं प्रवास केला नाही, असे मिश्कील उत्तर त्यांनी दिले. दरम्यान, गुढी पाडव्यानंतर राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंग्याचा मुद्दा पुढे आणला असून आता त्यांच्या अयोध्या दौऱ्याकडे आणि 1 मे महाराष्ट्र दिनाच्या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काय म्हणाले होते संजय राऊत
हनुमान आमच्याच पाठिशी आहे, हे कोल्हापूर उत्तरच्या जनतेने दाखवून दिले. महाराष्ट्रात भाजपात निराशा असून नेते वैफल्याने ग्रस्त आहेत. सत्ता येत नाही आमदार फुटत नाही. अशांतता पसरवण्याचा प्रयत्न करूनही लोकं शांतता भंग होऊ देत नाहीत. भोंगे यांनी लावायचे आणि नवहिंदु औवेसी आणि खरा औवेसी यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात दंगली भडकवायचा. त्यानंतर राजभवनातून केंद्राला अहवाल पाठवून राष्ट्रपती राजवट लागू करण्याचं हे षडयंत्र आहे, असा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला. यातून, राज यांना नवहंदु औवेसीही म्हटले.