छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीवर राज ठाकरे नतमस्तक; औरंगाबादला जाताना घेतले दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2022 06:03 PM2022-04-30T18:03:19+5:302022-04-30T18:20:17+5:30
यावेळी राज ठाकरे म्हणाले, 'समाधीस्थळाच्या विकास आराखड्यासंदर्भात स्थानिकांशी चर्चा करणार...'
कोरेगाव भीमा (पुणे) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (दि.३०) रोजी श्री क्षेत्र वढू बुद्रुक (तालुका शिरूर) येथील धर्मवीर छत्रपती शंभूराजांच्या समाधीस्थळावर नतमस्तक झाले. छत्रपती संभाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे दर्शन घेतल्यानंतर ग्रामपंचायत, स्मृती समिती व धर्मवीर संभाजीराजे युवा मंच यांच्यावतीने सन्मान केल्यानंतर त्यांनी संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाच्या विकास आराखड्यासंदर्भात स्थानिकांशी चर्चा करणार असल्याचे सांगितले.
मनसेचे राज ठाकरे हे पुण्याहून औरंगाबाद येथे निघाले होते. यावेळी त्यांनी श्री क्षेत्र वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीवर नतमस्तक झाल्यानंतर कवी कलश यांच्या समाधीचे त्यांनी दर्शन घेतले. समाधीस्थळी असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला त्यांनी पुष्पहार अर्पण केला.
राज ठाकरे या ठिकाणी येणार असल्याने सकाळपासूनच मनसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी समाधीस्थळावर अविनाश मरकळे यांनी राज ठाकरे यांना समाधीस्थळावरील नित्यपुजेची माहिती देत शिवप्रेरणा मंत्राचे पठण केले.
यावेळी राज ठाकरेंसोबत मनसे नेते अनिल शिदोरे, बाबू वागस्कर, सरचिटणीस किशोर शिंदे, उपाध्यक्ष बाळा शेडगे, शहराध्यक्ष साईनाथ बाबर, प्रभारी निरिक हेमंत बत्ते, उपाध्यक्ष रामदास दरेकर, महेबूब सय्यद, वढू बुद्रुकच्या सरपंच सारीका शिवले, उपसरपंच हिरालाल तांबे, धर्मवीर संभाजी महाराज स्मृती समितीचे मिलींद एकबोटे, सोमनाथ भंडारे, अंकुश शिवले, माऊलीआप्पा भंडारे, अनिल भंडारे, कृष्णा आरगडे, राहुल कुंभार, माजी सदस्य सचिन भंडारे व मनसेचे अंकुश शिवले, राजेश शिवले, राजेंद्र शिवले, मंगेश शिवले व शंभूभक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.