"पाण्याखाली गेलेल्या वाहनांचा मिळणार इन्शुरन्स"; पुण्यात राज ठाकरेंकडून पूरस्थितीचा आढावा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2024 12:00 PM2024-08-04T12:00:05+5:302024-08-04T12:29:28+5:30

राज ठाकरे यांनी एकता नगरमध्ये येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा झालेल्या मुद्द्यांची माहिती दिली.

Raj Thackeray came to Pune Ekta Nagar and informed about issues discussed with CM Eknath Shinde | "पाण्याखाली गेलेल्या वाहनांचा मिळणार इन्शुरन्स"; पुण्यात राज ठाकरेंकडून पूरस्थितीचा आढावा

"पाण्याखाली गेलेल्या वाहनांचा मिळणार इन्शुरन्स"; पुण्यात राज ठाकरेंकडून पूरस्थितीचा आढावा

Raj Thackeray : पुण्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. अशातच मुळशी, खडकवासला, पानशेत आदी धरणांतून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पूरस्थिती पुन्हा उद्भवण्याचा धोका निर्माण झाला आहे. धरणातून विसर्ग सोडल्याने सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. गेल्यावेळीप्रमाणे पुन्हा एकता नगरमध्ये पाणी भरण्यास सुरुवात झाल्याने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकता नगरमध्ये येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या चर्चेची माहिती दिली.

शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुण्यातील एकता नगरमध्ये दाखल झाले. राज ठाकरे यांनी एकता नगर भागातील पुरग्रस्तांची भेट घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीची माहिती नागरिकांना दिली. या बैठकीत पुण्यातील पुरासंदर्भात चर्चा करण्यात आल्याचे राज ठाकरे म्हणाले.

"आठवड्याभरापूर्वी येथे आले होतो. त्यानंतर मी याविषयी सरकारशी बोलेन आणि मार्ग काढेन असं सांगितलं होतं. त्याप्रमाणे काल मुख्यमंत्र्यांसोबत माझी बैठक झाली. महत्त्वाच्या तीन विषयांबाबत माझं बोलण झालं. मुळा मुठा कॉरिडॉरमधील अनधिकृत गोष्टी बाजूला काढण्यासंदर्भात चर्चा केली. त्याचे काम सुरु झालेलं आहे. दुसरा विषय पुनर्विकासाचा होता. तुम्हाला एफएसआय मिळत नसल्याने पुनर्विकासाचा विषय अडला होता.  पुनर्विकास होण्यासाठी जागा एफएसआय मिळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला आहे. एफएसआय वाढला तर पुनर्विकास होऊ शकेल आणि त्यासंदर्भातील पावले पुढच्या आठवडाभरामध्ये उचलली जातील. इथल्या तीन लाख नागरिकांचा पुनर्विकास होईल. तिसरा विषय हा पाण्याखाली गेलेल्या वाहनांचा होता. वाहने पाण्याखाली गेल्यानंतर विमा कंपन्या इन्शुरन्स देत नाहीयेत. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात पुणे महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी या दोघांनाही विमा कंपन्यांसोबत बोलून घेण्यास सांगितले आहे. विमा कंपन्यांकडून सगळ्या वाहनांचा इन्श्युरन्स मिळून द्यायचा आहे. मुळा मूठा रिव्हर फ्रंन्टसंदर्भात पुण्यातील नागरिकांची समिती करुन आणि महानगरपालिकेशी बोलूनच पुढचा कार्यक्रम होणार आहे. त्यासाठी संरक्षक भिंती बांधण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत," अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली.

दरम्यान, धरणांमधून विसर्ग सुरु करण्यात आल्यानंतर पालकमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भात एक पोस्ट लिहून पुणेकरांना इशारा दिला. "पुणे जिल्ह्यातील खडकवासला, पवना, मुळशी, चासकमान धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत असून धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने या धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू करण्यात येत आहे. खडकवासला धरणातून सध्या २७ हजार १६ क्युसेक्स, मुळशीतून २७ हजार ६०९ क्युसेक्स, पवनातून ५ हजार क्युसेक्स, चासकमान धरणातून ८ हजार ५० क्युसेक्स वेगाने विसर्ग सुरु आहे," असे अजित पवार म्हणाले.
 

Web Title: Raj Thackeray came to Pune Ekta Nagar and informed about issues discussed with CM Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.