"आता काय त्या बाथरूममध्ये पळत-पळत आंघोळ करू?" राज ठाकरेंचं वक्तव्य अन् सभागृहात एकच हशा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2023 05:11 PM2023-10-21T17:11:52+5:302023-10-21T17:16:17+5:30
आर्टिटेक्टचे महत्व सांगताना राज यांनी महाराष्ट्रातील सर्किट हाऊसेस अथवा शासकीय विश्राम गृहांवरही भाष्य केले. यावर सभागृहातील उपस्थितांमध्ये एकच हशा उडाला.
आपण ज्याला सौंदर्यदृष्टी म्हणतो. ती मुळात सत्तेत असावी लागते. जो राजा असतो, जो राज्यकर्ता असतो, राज्यकर्त्याला जर सौंदर्यदृष्टी असेल तर ती खालपर्यंत झिरपते, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी म्हटले आहे. याच वेळी आर्टिटेक्टचे महत्व सांगताना राज यांनी महाराष्ट्रातील सर्किट हाऊसेस अथवा शासकीय विश्राम गृहांवरही भाष्य केले. यावर सभागृहातील उपस्थितांमध्ये एकच हशा उडाला. पुण्यात जागतिक आर्किटेक्ट दिनानिमित्त, "शहर नियोजन, सौंदर्यदृष्टी आणि शाश्वत विकास" या विषयावर ज्येष्ठ लेखक दीपक करंजीकर यांनी राज ठाकरे यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर विस्तृत भाष्य केले.
...अन् मग तुमचे तुमच्या वास्तू कशा असाव्यात हे इंजिनिअर ठरवतो -
राज ठाकरे म्हणाले, महापालिकेत, राज्यसरकारमध्ये डेव्हलपमेंट प्लॅन होतो, पण टाउन प्लॅन होत नाही आणि टाउन प्लॅनिंग झाले नाही. तर ही शहरं अशीच बकाल होणार. म्हणजे महानगरपलिका, राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये जेवढे महत्व इंजिनिअरला आहे, तेवढे आर्किटेक्टला नाही आणि मग तुमचे रस्ते कसे असणार, तुमच्या वास्तू कशा असाव्यात हे इंजिनिअर ठरवतो. आर्किटेक्ट ठरवत नाही.
आता काय पळत पळत आंघोळ करू का बाथरूममध्ये? -
मी महाराष्ट्रातील सर्किट हाऊसेस बघितली. त्यात एवढी मोठ मोठी बाथरूम असतात. आता काय पळत पळत आंघोळ करू का त्यात. पण मागचा पुढचा विचार नाही. तिकडचा कुणी पीडब्ल्यूडीचा इंजिनिअर ठरवतो. तिकडची जागा बघतो, त्यात काही तरी करतो. त्याच्या मनाप्रमाणे टाइल्स लावतो.
"आता तिकडे एखादे नवे दामपत्य गेले, तर..."
बीडच्या एका सर्किट हाऊसचे उदाहरण देताना राज ठाकरे यांनी सांगितले, मी बीडला एका सर्किट हाऊसला गेलो होतो. ते एरिगेशनचं होतं. मी बेडरूममध्ये गेलो. ती बेडरूम नव्हतीच, एक मोठा हॉल होता आणि त्याच्या मधे पलंग होता. आता तिकडे एखादे नवे दामपत्य गेले, तर ते काय पकडापकडी खेळणार का त्याच्या भोवती. मधे कुणी पलंग ठेवतं का? पण तुम्ही बीडच्या सर्किट हाऊसला जा तेथे मधे पलंग आहे.
महाराष्ट्राची सत्ता माझ्या हातात येईल तेव्हा... -
राज म्हणाले, यामुळेच ही संपूर्ण दृष्टी राज्यकर्त्यांकडे असावी लागते. जे राज्य करतात त्यांनी या गोष्टी बघायला लागतात. जेव्हा कधी महाराष्ट्राची सत्ता माझ्या हातात येईल तेव्हा शहराचं नियोजन करण्यासाठी प्लॅनिंग आर्किटेक्टच्या हाती देईन हा माझा शब्द आहे, असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले.