Raj Thackeray: वाकलेल्या सरकारने ‘शिदं’ सारखे ताठ मानेने चालवून दाखवा; राज ठाकरेंचा उपरोधिक टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 12:47 PM2024-07-30T12:47:11+5:302024-07-30T12:51:38+5:30
सध्या राजकारणात काय चाललंय ते मला समजतच नाहीय, १००व्या वर्षांत पदार्पण केलेल्या शि. द. फडणीस यांचाही सरकारला टोला
पुणे : ‘शिद’सर आज शंभराव्या वर्षात पदार्पण करत आहेत. पण, त्यांना पाहून जाणवत नाही. चंद्रकांतदादा मघाशी बोलत होते की, ‘शिदं’कडून काही तरी घ्यायला हवं. तर मला वाटतं. इतक्या ताठ पध्दतीने सरकार चाललं, तरी बरं होईल. सरकारने ‘शिदं’सारखं ताठ मानेने चालून दाखवावं. कारण सरकार वाकलेलं आहे. त्यात आणखी कोणाला घेऊ नका. सरकारला ‘‘या झाडाची फळं पाहिजेत. त्या झाडाची फळ पाहिजेत, त्यांना सर्वच हवं आहे, असं करू नका ! जरा ताठ मानेने सरकार चालवून दाखवा,’’ असा उपरोधिक टोला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारला लगावला आणि सभागृहात एकच हंशा पिकला.
शिवराम दत्तात्रय फडणीस अर्थात सर्वांचे लाडके ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांनी २९ जुलै २०२४ रोजी १००व्या वर्षांत पदार्पण केले. त्यानिमित्त वसुंधरा क्लब व कार्टूनिस्ट्स कम्बाईन संयुक्तपणे कोहिनूर प्रस्तुत ‘शि. द. १००’ या भव्य ४ दिवसांच्या महोत्सवाचे आयोजन केले आहे. त्याचे उद्घाटन आणि ‘शिदं’चा सत्कार सोहळा सोमवारी (दि. २९) आयोजिला होता. त्याप्रसंगी राज ठाकरे बोलत होते. यावेळी शि. द. फडणीस, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत, संयोजक विरेंद्र चित्राव, मंगला गोडबोले, कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, चारूहास पंडित, नितीन ढेपे, संजय मिस्त्री आदी उपस्थित होते.
राज ठाकरे यांनी कोटीवर कोटी करत सर्वांना हसवले. ते म्हणाले की, ‘शिदं’चे आडनाव फडणीस. ‘व’ नसल्याने त्यांना वाचवलं. फडणीस म्हणून ते व्यंगचित्रकार झाले. फडणवीस असते, तर त्यांची व्यंगचित्रे झाली असती. पण, मला आनंद एका गोष्टीचा आहे. वयामध्ये खूप अंतर असले तरी मी जे. जे. आर्ट स्कूलचा आणि सरदेखील त्याच स्कूलचे.
‘शिदं’बद्दल गौरवोद्गार काढताना ठाकरे म्हणाले, ’’चित्र काढताना कल्पना कशी सूचते? खरंच कळत नाही. पण, उत्तम कल्पना आणि उत्तम रेखाटन असलं की, त्याचे उत्तम व्यंगचित्र होते. उत्तम चित्रे काढलीत, पण जर त्याची कल्पना दरिद्री असेल, तर पाहणाऱ्यावर काही फरक पडत नाही. पण, सरांच्या चित्रात कल्पना आणि रेखाटन उत्तम असते. सर गेल्या ७५ वर्षांपासून काम करत आहेत. ही साधी गोष्ट नाही. अशी माणसं युरोपात जन्मली असती तर सरकारला सांगायची वेळ आली नसती की, त्यांच्या नावाने कला दालन काढा. तिथे ते असतेच.’’
सरकारने आधी आर्ट स्कूल सुधारावीत
चंद्रकांत पाटील यांनी ‘शिदं’च्या नावाने अकादमी सुरू करू, असे आश्वासन दिले. त्यावर ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, ‘‘अकादमीची गरज नाही. आहे त्या आर्ट स्कूल सुधारल्या तरी पुरेसे होईल. सध्या जे. जे. आर्ट स्कूलची हालत खूप खराब आहे. तिथे असलेल्या ‘डीन’ला साधं फुल पण काढता येत नाही. अशा प्रकारची लोकं आर्ट स्कूलमध्ये असली तर कसं होणार! बरं, उद्या अकादमी काढली, तर त्यात शिकवणार कोण? कोणीच नाही ! उद्या लता मंगेशकरांची अकादमी काढली, तर तिथे शिकवणार कोण? त्यांचा आवाज आणायचा कुठून? सरकारने अकादमी स्थापन न करता आर्ट स्कूल सुधारावीत.’’
राजकारणावर बोलण्यासारखं माझ्याकडे काही नाहीय. सध्या राजकारणात काय चाललंय ते मला समजतच नाहीय. असो! चित्र ही एक भाषा आहे. चित्र ही उर्जा आहे. आता काही माध्यमं नवीन येताहेत. काही क्षेत्र ऑनलाइन होताहेत. जसे संमेलन, भाषण ऑनलाइन होत आहेत. पण, यात चित्रांची भाषा शाबूत राहावी. वयाच्या या टप्प्यात मला सुंदर दृश्य पाहायला मिळतेय. वाईट गोष्टी असतील, पण सुंदर गोष्टी पाहा. - शि. द. फडणीस, ज्येष्ठ व्यंगचित्रकार