राज ठाकरेंनी माझी गाडी चालवणे हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण !
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2019 02:49 PM2019-10-09T14:49:02+5:302019-10-09T14:50:07+5:30
राज ठाकरे हे पुण्यात सभेसाठी आले असताना त्यांनी कार्यकर्त्याच्या गाडीचे उद्घाटन करत त्याच्या विनंतीचा मान ठेवला.
पुणे : विधानसभेच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर असल्याने सर्वच राजकीय पक्ष प्रचाराला लागले आहेत. राज ठाकरे आज पुण्यात सभा घेणार असून आजच्या सभेपासून ते प्रचाराचा नारळ फाेडणार आहेत. राज ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचं नातं सर्वांना माहित आहे. ठाकरेंच्या एका कार्यकर्त्यांने दसऱ्याच्या मुहूर्तावर नवी कार घेतली त्याचे उद्घाटन करण्याची विनंती त्याने ठाकरे यांना केली. ठाकरेंनी सुद्धा त्याच्या विनंतीला मान देत त्याची गाडी चालवून त्याला शुभेच्छा दिल्या. आपल्या नेत्याने आपल्या पहिल्या गाडीचे उद्घाटन केल्याने कार्यकर्त्याच्या आनंदाला पारावार उरला नव्हता.
राज ठाकरे यांची सभा आज पुण्यातील नातू बागेतील मैदानात हाेत आहे. त्यासाठी राज ठाकरे पुण्यात दाखल झाले आहेत. दसऱ्याच्या शुभमुहुर्तावर त्यांनी मनसेचे काेथरुडचे उमेदवार किशाेर शिंदे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घान केले. दसऱ्याच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा उपाध्यक्ष सचिन ननावरे याने नवी कार घेतली हाेती. त्या कारचे उद्घाटन राज ठाकरे यांनी करावे अशी त्याची इच्छा हाेती. तशी विनंती देखील त्याने राज ठाकरेंना केली. त्याच्या विनंतीचा मान ठेवत ठाकरे यांनी त्याला गाडी घेऊन त्यांच्या पुण्यातील निवासस्थानी येण्यास सांगितले. त्यानुसार आज सकाळी ठाकरे यांनी ननावरे याची गाडी चालवत त्याला शुभेच्छा दिल्या. एका सामान्य कार्यकर्त्याचा मान राखत ठाकरेंनी गाडी चालविल्याने ननावरे याला अत्यंत आनंद झाला.
लाेकमतशी बाेलताना सचिन ननावरे म्हणाला, दसऱ्याच्या मुुहुर्तावर मी नवी कार घेतली हाेती. त्या गाडीचे उद्घाटन राज साहेबांनी करावे अशी माझी इच्छा हाेती. मी त्यांच्याजवळ बाेलून दाखवली. माझ्या विनंतीला मान देत राज साहेबांनी आज माझ्या गाडीचे उद्घाटन केले. माझ्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची गाडी साहेबांनी चालविल्याने माझा आनंद द्विगुणीत झाला आहे.