पुण्यात राज ठाकरेंचे हनुमान चालीसा पठण; तर राष्ट्रवादीच्या वतीने हिंदूंकडून मुस्लिमांचा रोजा इफ्तार कार्यक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 01:37 PM2022-04-15T13:37:02+5:302022-04-15T13:37:46+5:30
पुण्यात मनसे आणि राष्ट्रवादी आमनेसामने आल्याचे चित्र दिसू लागले आहे
पुणे : पुण्यात सदाशिव पेठेतील कुमठेकर रस्त्यावरील प्रसिद्ध खालकर मारुती मंदिरात राज ठाकरे यांच्या हस्ते हनुमान जयंतीनिमित्त मारुतीच्या पूजेचे आयोजन करण्यात आले आहे. खालकर चौक मारुती मंदिरच्या कार्यक्रमाला ठाकरे हनुमान जयंतीला (शनिवार) पुण्यात उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या हस्ते सायंकाळी ६ वाजता मारुतीची महाआरती आयोजित करण्यात आली आहे. त्याचवेळी हनुमान चालिसा पठणही होणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि साखळीपीर राष्ट्रीय मारुती मंदिर यांच्या वतीने हिंदूंकडून मुस्लिमांचा रोजा इफ्तार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आज सायंकाळी ६. २५ वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
यामुळे शहरात मनसे आणि राष्ट्रवादी आमनेसामने आल्याचे चित्र दिसू लागले आहे. शहरात शनिवारी मनसेकडून होणाऱ्या कार्यक्रमात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची हिंदू जननायक अशी प्रतिमा निर्माण कऱण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी छापलेल्या पत्रिकांवर राज यांची भगव्या शालीत लपेटलेली प्रतिमा प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात हिंदूंकडून मुस्लिमांचा रोजा इफ्तार आयोजित करण्यात आला आहे. राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंगे काढण्याची जाहीर भूमिका घेतल्यानंतर मनसे हिंदुत्ववादाकडे जाऊ लागल्याच्या चर्चाना उधाण आलाय. तर दुसऱ्या बाजूने राष्ट्रवादी सर्वधर्मसमभाव अशी भूमिका घेताना दिसून येत आहे.
राज ठाकरेंनी दिलाय राज्य सरकारला इशारा
पुढील महिन्यात ३ मेला देशभरता ईद साजरी केली जाणार आहे. राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी राज्य सरकारला ३ मेपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. भोंगे खाली न उतरवल्यास मशिदींसमोर लाऊड स्पीकरवर हनुमान चालिसा लावण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
शरद पवार म्हणाले विचार करू
राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंगे काढण्याची जाहीर भूमिका घेतल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. भोंगे खाली न उतरवल्यास मशिदींसमोर लाऊड स्पीकरवर हनुमान चालिसा या राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर शरद पवारांनी भोंग्याबाबत विचार करून निर्णय घेला जाईल असे मात व्यक्त केले आहे.