Raj Thackeray In Pune : काय पोरकटपणा सुरूये समजत नाही, राज ठाकरेचा हिंदुत्वावरून मुख्यमंत्र्यांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2022 12:14 PM2022-05-22T12:14:22+5:302022-05-22T12:15:01+5:30
"खरं हिंदुत्व काय आहे याचे रिझल्ट लोकांना हवे. महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला आम्ही रिझल्ट देतो," राज ठाकरे यांचं वक्तव्य.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या सभेदरम्यान अयोध्या दौरा, हिंदुत्व अशा अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी हिंदुत्वावरून त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. सध्या काय पोरकटपणा सुरू आहे हे समजत नाही, असं म्हणत त्यांनी जोरदार निशाणा साधला.
“त्या दिवशी मुख्यमंत्र्यांची सभा झाली. सध्या काय पोरकटपणा सुरूये समजतच नाही. आमचं खरं हिंदुत्व, यांचं खोटं हिंदुत्व. तुम्ही काय वॉशिंग पावडर विकताय का? खरं हिंदुत्व काय आहे याचे रिझल्ट लोकांना हवे. महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला आम्ही रिझल्ट देतो,” असं राज ठाकरे म्हणाले.
“उत्तर प्रदेश, बिहारचं जे बोलतायत त्या आंदोलनाला १२-१४ वर्ष झाली. महाराष्ट्रात रेल्वे भरती होती. त्यासाठी तिकडून हजारोनं लोकं महाराष्ट्रात रेल्वे स्टेशन्सवर आली. मी त्याचे फोटो पाहिले, पदाधिकाऱ्यांना त्यांच्याशी भेटून बोलण्यास सांगितलं. आमचे लोक भेटून बोलायला गेले होते. तिथे बोलताना, बाचाबाचीत तिथल्या एका मुलानं पदाधिकाऱ्याला आईवरून शिवी दिली. हे प्रकरण तिकडून सुरू झालं. महाराष्ट्रात रेल्वे भरती आहे याच्या जाहीराती इकडे नाही, त्याच्या जाहिराती उत्तर प्रदेश, बिहारमध्ये येत होत्या. तिकडे भरती होत असेल तर त्यांना मिळाल्या पाहिजे, महाराष्ट्रात होत असेल तर इथल्या मुलांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे,” असंही ते म्हणाले. जेव्हा ममता बॅनर्जी रेल्वे मंत्री झाल्या तेव्हा त्यांनी स्थानिक भाषांमध्ये परीक्षा घेणार असं सांगितलं आणि त्यानंतर महाराष्ट्रातील हजारो लोकांना रेल्वेत नोकरी मिळाली.
कोणतं आंदोलन अर्धवट सोडलं?
राज ठाकरे आंदोलन अर्धवट सोडतात म्हणतात, कोणतं आंदोलन अर्धवट सोडलं हे सांगावं. टोलचं आंदोलन घेतलं, महाराष्ट्रातील ६४ ते ७० टोलनाके मनसेमुळे बंद झाली. बाकीच्या पक्षांची काही जबाबदारीच नाही का ? असा सवालही त्यांनी केला. पाकिस्तानी कलाकारांनाही हकलावून दिले, त्यावेळी हिंदुत्वाची पकपक करणारे कुठे होते असा सवालही त्यांनी केला. रझा अकादमीविरोधातही मोर्चा मनसेनं काढलं. उद्धव ठाकरेंनी एक सांगावं तुमच्या अंगावर आंदोलन केल्याची एक केस तरी आहे का?, भूमिकाच कोणती घ्यायची नाही, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.