राज ठाकरेंच्या प्रश्नांना शरद पवारांची उत्तरं  

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2018 06:08 PM2018-02-21T18:08:12+5:302018-02-21T21:05:32+5:30

शरद पवार आणि राज ठाकरे यांच्या बहुचर्चित मुलाखतीतील ठळक मुद्दे...

Raj Thackeray interview with Sharad Pawar at Pune | राज ठाकरेंच्या प्रश्नांना शरद पवारांची उत्तरं  

राज ठाकरेंच्या प्रश्नांना शरद पवारांची उत्तरं  

Next

पुणेः राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि देशाच्या राजकारणातील एक वजनदार नेते शरद पवार यांच्या आजवर अनेक मुलाखती झाल्या असल्या, तरी आजची मुलाखत विशेष आहे. कारण, मुलाखतकार आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे. मुरब्बी पवार आणि रोखठोक राज यांच्यातील जुगलबंदी ऐकण्यासाठी सगळ्यांचेच कान टवकारलेत. या बहुचर्चित मुलाखतीतील ठळक मुद्दे LIVE...

राज ठाकरेः खरं बोलल्याचा कधी त्रास झालाय का?
शरद पवारः राजकारणात खरं बोलणं गरजेचं असतं, पण अडचणीचं असेल तिथे न बोलणं बरं असतं... समाज किंवा व्यक्तीचं मन दुखवायचं नसेल तर कुठे थांबायचं हे कळलं पाहिजे.  

राज ठाकरेः यशवंतराव चव्हाणांच्या पिढीचं मूल्याधिष्ठीत राजकारण आज दिसत नाही. त्याबद्दल...
शरद पवारः यशवंतराव चव्हाण महाराष्ट्रातील तरुणांचे आदर्श. समाजकारण, राजकारण कुठेही जा, पण योगदान दिलंय, त्यांच्याबद्दलची विनम्रता सोडू नका, ही शिकवण त्यांनी दिली. संस्कारच असे होत गेले की आपण एका चौकटीबाहेर कधीही जाता कामा नये. संघर्ष झाला, पण चौकट सोडली नाही. आज व्यक्तिगत हल्ले करताना आपण कोणत्या पदावर आहोत याचंही स्मरण होत नाही. यावेळच्या अधिवेशनात राष्ट्रपतींच्या आभाराचा प्रस्ताव होता. त्यावेळी गांधी-नेहरू घराण्यावर एवढा व्यक्तिगत हल्ला केला गेला. जवाहरलाल नेहरूंनी देशासाठी काहीच केलं नाही, हे विधान पटणारं. वैचारिकदृष्ट्या मतभेद असले तरी दुसऱ्याच्या विचाराचं स्वागत, सन्मान करण्यात अटलबिहारी वाजपेयी आदर्श.

राज ठाकरेः महाराष्ट्र देशाचा विचार करत आला, महाराष्ट्राचा विचार झाला नाही. इतर राज्यांचे नेते असं करत नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सगळ्यांना अहमदाबादला नेतात. यात महाराष्ट्र आणि मराठीचं नुकसान नाही का?
शरद पवारः काही प्रमाणात झळ बसते ही वस्तुस्थिती. पण महाराष्ट्रासाठी देश नेहमीच मोठा राहिलाय. तुम्ही देशाचे नेते आहात, हे लक्षात ठेवा. ही भावना आज प्रत्येक सदस्याची आहे.

राज ठाकरेः पण हे आपला शिष्य ऐकतो का? 
शरद पवारः मी कृषिमंत्री असताना नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री. गुजरातमधील शेतीच्या विकासाचा विचार करणारे गृहस्थ होते. मुख्यमंत्री परिषदेत मोदी सतत तेव्हाचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर व्यक्तिगत हल्ला करायचे. ते कोणालाही पटायचं नाही. पण गुजरात हा देशाचा भाग आहे, हीच माझी भूमिका असायची. मी पवारांची करंगळी धरून राजकारणात आलो असं मोदी म्हणाले. पण माझी करंगळी कधीही त्यांच्या हातात सापडली नाही. मोदींनी मला गुरूपण दिलं, त्यात काही अर्थ नाही. व्यक्तिगत सलोखा आहे. 

राज ठाकरे: काँग्रेस-समाजवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी असं आत-बाहेर करताना मनात काय असायचं? 
शरद पवार : सार्वजनिक जीवनाची सुरुवात ही काँग्रेसमधून झाली. नेहरू-गांधींची विचारधारा मी कधी सोडली नाही. मतभेद झाल्यामुळे काँग्रेस पक्ष सोडावा लागला. शिंदेंनी माझ्यासोबतच काँग्रेस सोडली, परंतु निवडणुकांनंतर शिंदेंसारखे नेते परत काँग्रेसमध्ये गेले. शिंदेंनी काँग्रेसची वीट कधी सोडली नाही.

राज ठाकरे: बाबरी मशिद पडल्यावर तुम्हाला मुंबईला पाठवण्यात आलं. त्यावेळी नरसिंहराव आणि तुमच्यात नेमकं काय झालं ? 
शरद पवार: जगाचं लक्ष दिल्लीपेक्षा आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईकडे अधिक असतं. मुंबई पेटल्याचं समजताच गुंतवणूक केलेल्या घटकांसाठी चिंतेची बाब निर्माण झाली. त्यामुळेच मला केंद्रातून राज्यात मुख्यमंत्री म्हणून यावं लागलं. महाराष्ट्रासाठी मुंबईत जावं असा आग्रह नरसिंहरावांनी धरला. त्यामुळं मी मुंबईत आलो. दिल्लीत बसून राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या अधिकारांत हस्तक्षेप करणं योग्य नव्हतं.

राज ठाकरेः शिवाजी पार्कमध्ये एकत्र आलेले पवार, बाळासाहेब आणि जॉर्ज फर्नांडिस पुढे एकत्र राहतील, असं वाटलं होतं का ?
शरद पवारः बाळासाहेबांमध्ये दातृत्वाची भावना होती. बाळासाहेब आणि माझे संबंध चांगले होते, जॉर्ज फर्नांडिस व बाळासाहेबांचे संबंधही उत्तम होते. गिरणगाव बंद पडल्यास मुंबई थांबेल, त्यामुळे गिरण्या सुरूच राहिल्या पाहिजेत, असं बाळासाहेबांनी सांगितलं होतं. त्यामुळेच शिवाजी पार्कच्या सभेत आम्ही तिघे फक्त कामगारांच्या प्रश्नांवर एकत्र आलो.

राज ठाकरेः तुम्ही शाहू व फुलेंचा महाराष्ट्र म्हणता पण शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र का म्हणत नाही ? 
शरद पवारः शाहु, फुले, आंबेडकरांनी महाराष्ट्राला एक केलं. जात, पात, धर्म विसरून राज्याला एकत्र करणारे ते नेते होते. आज त्याच विचारांची गरज आहे. महाराष्ट्र हा शिवाजी महाराजांचाच आहे, त्याबद्दल कोणालाही शंका नाही. महाराष्ट्र मजबूत ठेवला पाहिजे.

राज ठाकरेः प्रत्येक महापुरुषाकडे जातीच्या दृष्टिकोनातून पाहिलं जातंय. जातीजातीत जो कडवटपणा आलाय, तो कसा दूर होईल? 
शरद पवारः शाहू-फुले-आंबेडकरांचा विचार, मराठी अस्मिता आणि राष्ट्राची अस्मिता अधिक बिंबवण्याची गरज. तुम्ही ते कराल कारण तुमच्यावर ते संस्कार आहेत. बाळासाहेबांनी कधीच जात पाहिली नाही, कर्तृत्व पाहिलं. अशी अनेक माणसं उभी केली. सत्तेवर बसलेल्यांकडून फूट पाडण्याचा प्रयत्न होतोय, प्रोत्साहन दिलं जातंय. पण हे फार दिवस टिकेल असं वाटत नाही. महाराष्ट्र या रस्त्याने जाणार नाही. तो शाहू-फुलेंच्या विचारानेच जाईल.

राज ठाकरे- महाराष्ट्रात आधी गरिबी होती पण शेतकरी आत्महत्या करत नव्हते. आज आत्महत्येचं प्रमाण का वाढतेय?
शरद पवार- केवळ कर्जमाफी हे उत्तर नाही तर शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणं, त्यांच्या मालाला भाव दिला तरच परिस्थिती बदलेल. कर्जबाजारीपणा हे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं मुख्य कारण आहे. आम्ही 71 हजार कोटींची कर्जमाफी दिल्यानं त्या काळात आत्महत्येच प्रमाण घटलं. 

राज ठाकरे-  वसंतराव नाईक, सुधाकराव नाईक, कन्नमवार असे तीन मुख्यमंत्री झाले असतानाही वेगळ्या विदर्भाची मागणी का होते ?
शरद पवार - विदर्भ हा पूर्वी हिंदी भाषक मध्य प्रदेशचा भाग होता. वेगळ्या विदर्भाची मागणी ही फक्त चार जिल्ह्यांपुरतीच मर्यादित होती. वेगळ्या विदर्भाच्या चळवळीचं नेतृत्व हे हिंदी भाषकांकडे गेलं होतं. सामान्य मराठी माणूस वेगळ्या विदर्भाच्या बाजूने नाही.

राज ठाकरे-  बुलेट ट्रेनच्या माध्यमातून मुंबई स्वतंत्र करण्याचा भाजपा सरकारचा डाव आहे का ?
शरद पवार- अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनच्या माध्यमातून मुंबईची गर्दी वाढणार आहे. इथून अहमदाबादमध्ये कोणी जाणार नाही, पण तिथूनच लोकं मुंबईत येतील. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र मुंबई महाराष्ट्रापासून कोणी तोडू शकत नाही.

राज ठाकरे - नरेंद्र मोदींबद्दल तुमचं आधी आणि आता नक्की मत काय? 
शरद पवार- नरेंद्र मोदींकडे कष्ट करण्याची वृत्ती आहे. परंतु देश चालवणं आणि राज्य चालवणं यात फरक असतो. देश चालवण्यासाठी टीम लागते. मोदींकडे टीमचा अभाव दिसतोय.

राज ठाकरे- काँग्रेसचं भविष्य काय आहे आणि राहुल गांधींबाबत तुमचं मत काय?
शरद पवार- पूर्वीसारखी काँग्रेस आता राहिली नाही. काँग्रेसची अनेक ठिकाणी पीछेहाट होतेय. राहुल गांधींमध्ये बदल होतोय. त्यांच्यात शिकण्याची तयारी आहे. ज्यामधलं आपल्याला समजत नाही ते समजून घेण्याचा राहुल गांधींचा सध्या प्रयत्न सुरू आहे, ही चांगली गोष्ट आहे. 

..

Web Title: Raj Thackeray interview with Sharad Pawar at Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.