राज ठाकरे हे स्वतंत्र व्यक्तिमत्व; ते कोणाची 'बी टीम' म्हणून काम करणार नाहीत-चंद्रकांत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 03:49 PM2022-04-14T15:49:56+5:302022-04-14T15:58:54+5:30
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळावा, ठाण्याची सभा या दोन्ही ठिकाणी हिंदुत्वाच्या मुद्दयाला धरून शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीवर टीका केली
पुणे : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळावा, ठाण्याची सभा या दोन्ही ठिकाणी हिंदुत्वाच्या मुद्दयाला धरून शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीवर टीका केली. तसेच भोंग्याबाबत सरकारला अल्टिमेटम दिला आहे. यानंतर राज ठाकरे भाजपशी युती करणार का? ते भाजपची बी टीम आहेत अशा चर्चा विरोधी पक्षांमध्ये सुरु झाल्या आहेत. त्यावरच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिले आहे. राज ठाकरे हे स्वतंत्र व्यक्तिमत्व असून ते कोणाची बी टीम म्हणून काम करणार नाहीत असे फेसबुकच्या माध्यमातून सांगितले आहे.
पाटील म्हणाले, राज ठाकरे यांच्या पाडवा मेळाव्यानंतर मनसे भाजपाची बी टीम असल्याचं खोटं महाविकास आघाडी आपल्या इको सिस्टीमच्या माध्यमातून पसरवण्याचा प्रयत्न करत आहे. राज ठाकरे हे स्वतंत्र व्यक्तिमत्व असून ते कोणाची बी टीम म्हणून काम करणार नाहीत.
खोटं पसरवण्यासाठी आघाडीची इको सिस्टीम
महाविकास आघाडीने खोटं पसवरण्यासाठी इको सिस्टीम तयार केली आहे. राज्यात बहुतेक ठिकाणी महाविकास आघाडीचे नेते समान खोटं बोलून ते खरं कस आहे हे जनतेला दाखवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही पाटील यांनी केला आहे.
युतीबाबत कुठलाही प्रस्ताव नाही
राज ठाकरेंच्या हिंदुत्व मुद्दयाला धरून भाषणानंतर मनसे आणि भाजपची युती होणार. अशा चर्चाना उधाण आलय. त्यावर पाटील यांनी स्पष्ट मत व्यक्त केले आहे. आता सध्या तरी कुठलाही प्रस्ताव नाही. निर्णय केंद्राकडून घेतला जातो. आमची राज्याची १३ जणांची कोअर कमिटी आहे. ती जास्तीत जास्त प्रस्ताव पाठवण्याचे काम करते. पण तसा कोणताही निर्णय आम्ही घेतलेला नाही.