Raj Thackeray: बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळतील; राज ठाकरेंचे संकेत, आज काय बोलणार याबद्दल उत्सुकता
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 09:58 AM2022-12-28T09:58:49+5:302022-12-28T09:59:38+5:30
पुण्यातील मुक्तांगण बालरंजन केंद्र येथे आज सांयकाळी ६.३० ते ८.३० या वेळेत राज ठाकरेंचं व्याख्यान होत आहे
पुणे - मनसेप्रमुखराज ठाकरेंचं भाषण ऐकणं ही त्यांच्या चाहत्यांसाठी राज्यातील जनतेसाठी पर्वणीच असते. आपल्या भाषणात राज्यातील राजकीय, सामाजिक परिस्थितीचा वेध घेण्यात येतो. त्यातच, राज्यातील राजकारणावरही ते बेधडकपणे आपली भूमिका मांडत असतात. गेल्या काही दिवसांत त्यांच्या भाषणातून होत असलेल्या राजकीय बदलामुळे ते चांगलेच चर्चेत आहेत. तर, काही दिवसांपूर्वीच त्यांनी मनसेच्या गटप्रमुखांचा मेळावा घेत, कोकण, नागपूर दौरा करत आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली आहे. आता, एका व्याख्यानमालेच्या माध्यमातून राज ठाकरे महाराष्ट्राच्या जनतेला ''नवं काहीतरी''... सांगू इच्छित आहेत.
राज ठाकरे मंगळवारपासून पुण्यात असून मनसेच्या तीन कार्यालयांची उद्घाटनं त्यांच्याहस्ते झाली आहेत. या दरम्यान, ते पुण्यातील काही पदाधिकाऱ्यांसोबत बोलले, अनेकांनी प्रश्नही केले. तेव्हा, उद्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळतील, असं राज ठाकरेंनी म्हटल्याचं मनसेतील सुत्रांनी सांगितलं. त्यामुळे राज ठाकरे नेमकं काय बोलणार, याबद्दल मनसैनिकांना उत्सुकता आहे. कारण, सहजीवन व्याख्यानमालेत राज ठाकरे ''नवं काहीतरी''... या विषयावर बोलणार आहेत. त्यामुळे ते पक्षाच्या नवनिर्माणाबद्दल काय बोलणार, नेमकी कुठल्या प्रश्नांची उत्तरं देणार, त्यात कुणाला लक्ष्य करणार का की 'इंजिना'च्या पुढील प्रवासाची दिशा सांगणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
पुण्यातील मुक्तांगण बालरंजन केंद्र येथे आज सांयकाळी ६.३० ते ८.३० या वेळेत राज ठाकरेंचं व्याख्यान होत आहे. नवं काहीतरी... हा विषय घेऊन राज ठाकरे या सभागृहात महाराष्ट्राला काहीतरी नवं सांगणार आहेत. त्यामुळे, आजच्या व्याख्यानात नवं काहीतरी सांगताना कोणते जुने संदर्भ राज ठाकरे देतील. कोणत्या राजकीय नेत्यांवर टीका टिपण्णी करतील, कोणाची नक्कल करतील, हे सायंकाळी वाख्यानावेळीच पाहायला मिळेल.