Raj Thackeray: पुण्यात होणार राज ठाकरेंच्या हिंदुत्वाचा गजर; सभेसाठी मनसेचे पोलीस आयुक्तांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 04:19 PM2022-05-16T16:19:34+5:302022-05-16T16:20:47+5:30
पुढील आठवड्यात राज ठाकरेंचा पुणे दौरा निश्चित झाला आहे
पुणे : राज ठाकरेमनसेच्या वर्धापनदिनाला पुण्यात आले होते. त्यानंतर ठाणे, औरंगाबाद याठिकाणी सभा घेण्यात आली. राज ठाकरे यांनी सभेत भोंग्याच्या मुद्द्याला हात घातला होता. भोंगे उतरवण्याबाबत आंदोलनही पुकारण्यात आले होते. मशिदीवरचे जोपर्यंत भोंगे उतरवले जात नाहीत. तोपर्यंत कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरु ठेवावे अशी भूमिका त्यांनी घेतली होती. आता राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची जोरदार तयारी सुरु झाली आहे.
त्यातच आता पुढील आठवड्यात राज ठाकरेंचा पुणे दौरा निश्चित झाला आहे. २१ ते २८ मे दरम्यान त्यांचा पुणे दौरा होणार आहे. याच कालावधीत पुणे शहरातील सर परशुरामभाऊ महाविद्यालय येथे राज ठाकरेंची सभा होणार असल्याची माहिती मनसे पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यासाठी पुणे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांनी पोलीस आयुक्तांना परवानगीचे पत्र पाठवले आहे.
हिंदूजननायक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या पुणे शहरात होणा-या सभेचे आयोजन मे महिन्याच्या २१ ते २८ तारखेच्या दरम्यान पुणे शहर मनसे कडून करण्यात येत आहे. त्याकामी मनसेच्या वरिष्ठ नेत्यांनी दिलेल्या आदेशानुसार पुणे शहरातील सर परशुरामभाऊ महाविदयालय येथे सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. सदर ठिकाण सुरक्षिततेच्या दृष्टीकोना तुन तसेच सभेमुळे पुणे शहरातील वाहतूक कोंडी ची समस्या निर्माण न होण्याच्या दृष्टीकोनातून प्रशासनाच्या सुचने नुसार सर परशुरामभाऊ महाविदयालय चे मैदान निवडत आहोत. तरी सदर कामी आपण योग्य त्या सुचना संबंधीत यंत्रणा व सर परशुरामभाऊ महाविदयालय प्रशासन यांना दिल्यास आम्हाला सभेचे नियोजन करण्यास सहकार्य होईल तरी सदरबाबत योग्य ती कार्यवाही करावी असे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.