Raj Thackeray: नगरपरिषद-जिल्हा परिषदेसाठी मनसे बारामतीत उमेदवार देणार; राज ठाकरे स्वत: मैदानात उतरणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2022 02:12 PM2022-08-25T14:12:15+5:302022-08-25T14:12:35+5:30
मनसेनं पुण्यातील विविध लोकसभा मतदारसंघनिहाय निरीक्षक नेमले आहेत. त्यात बारामती लोकसभेसाठी वसंत मोरे यांना निरीक्षक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
पुणे- आगामी २०२४ लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. त्यात मनसेही सक्रीय झाल्याचं पाहायला मिळालं आहे. मनसेनं पुण्यातील विविध लोकसभा मतदारसंघनिहाय निरीक्षक नेमले आहेत. त्यात बारामती लोकसभेसाठी वसंत मोरे यांना निरीक्षक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. या जबाबदारीनंतर वसंत मोरे कामाला लागले आहेत.
आगामी नगरपरिषद आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मनसे बारामतीतुन उमेदवार उभे करणार असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच ही जबाबदारी पार पाडण्यासाठी वसंत मोरेंनी कंबर कसली आहे. बारामतीत नेमकं काम कसं करायचं? याचं नियोजन वसंत मोरे यांनी सुरु केलं आहे. तसेच बारामतीतील प्रचारादरम्यान मनसेप्रमुख राज ठाकरे यांना बोलवण्याचा मानस असल्याचंही वसंत मोरे यांनी स्पष्ट केलं आहे.
राज ठाकरे यांच्या सहीनं पत्रक जारी करण्यात आले आहे. त्यात मावळ लोकसभा मतदारसंघासाठी निरीक्षक म्हणून किशोर शिंदे, हेमंत संभूस, गणेश सातपुते यांची निवड करण्यात आली आहे. तर शिरूर लोकसभा मतदारसंघात अजय शिंदे, बाळा शेडगे आणि बारामती लोकसभा मतदारसंघात वसंत मोरे, सुधीर पाटसकर, रणजित शिरोळे यांना निरीक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. वसंत मोरे हे पुण्यातील कात्रज भागातील मनसे नगरसेवक आहेत. पक्षाच्या स्थापनेपासून ते राज ठाकरेंसोबत आहेत.
पुण्यात आज राज ठाकरे यांच्या उपस्थितीत या मोहिमेची सुरुवात करण्यात आली. यावेळी राज ठाकरेंनी नवीन घोषवाक्य जाहीर केले. 'मी हिंदवी रक्षक, मी महाराष्ट्र सेवक', असं मनसेचं नवं घोषवाक्य आहे. सदस्यनोंदणीला सुरुवात झाल्यावर राज ठाकरेंनी आजपासून राज्यभरात मनसेच्या सदस्य नोंदणीला सुरुवात झाली आहे. मी पहिली सदस्य नोंदणी केली आहे. मला मनसेचे सदस्य करून घेतले, मनापासून आभार मानतो, असे म्हटले.
दरम्यान, गणेशोत्सव, दसरा, नवरात्र, दिवाळीत अधिकाधिक लोकापर्यंत पोहोचण्यासाठी आणखी एक मोहिम उघडली जाणार असल्याचे राज ठाकरे म्हणाले. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ठिकाणी, चौकात मनसेचे बॅनर, पोस्टर लागले पाहिजेत. ते कसे असावेत, काय काय असावे हे तुम्हाला कळविले जाईल. परंतू, मला ते सर्वत्र दिसायला हवेत असेही राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना सांगितले.