राज ठाकरेंचे मनसे पदाधिकाऱ्यांना मुंबईत येण्याचे फर्मान; पुण्यातून ७ जण
By राजू इनामदार | Published: March 20, 2024 07:06 PM2024-03-20T19:06:11+5:302024-03-20T19:06:52+5:30
ही बैठक होण्याआधी कोणीही महायुतीत जाण्यासंबंधी प्रसारमाध्यमांबरोबर बोलू नये, अशी लेखी तंबी देणारे पत्र राज यांनी सर्व शहराध्यक्षांना पाठवले आहे....
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्लीतील केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीनंतर स्वपक्षाच्या पदाधिकाऱ्यांना गुरुवारी (दि. २१) मुंबईत बोलावले आहे. राज्यातील पदाधिकाऱ्यांची तिथे बैठक होणार असून, त्यात महायुतीत जाण्याच्या निर्णयावर राज ठाकरे पदाधिकाऱ्यांचे औपचारिक शिक्कामोर्तब करून घेतील, अशी चर्चा आहे.
पुण्यातून या बैठकीसाठी मनसेचे नेते राजेंद्र वागसकर, राज्य सरचिटणीस गणेश सातपुते, हेमंत संभूस, बाळा शेडगे, अजय शिंदे, किशोर शिंदे व रणजीत शिरोळे हे मुंबईला जाणार असल्याची माहिती मिळाली. फायरब्रँड नेते, मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी ही महायुती होण्याआधीच पुण्यात लोकसभा निवडणूक लढवण्यावरून पक्ष सोडला आहे. पुण्यात मनसेने लोकसभा लढवू नये, असा चुकीचा अहवाल स्थानिक नेत्यांनी राज यांना दिल्याचा त्यांचा आरोप आहे. ते आता मुंबईतील या बैठकीला नसतील, मात्र बाकी पदाधिकारी जाणार आहेत.
दरम्यान, ही बैठक होण्याआधी कोणीही महायुतीत जाण्यासंबंधी प्रसारमाध्यमांबरोबर बोलू नये, अशी लेखी तंबी देणारे पत्र राज यांनी सर्व शहराध्यक्षांना पाठवले आहे. पुण्यातही हे पत्र मिळाले असून, त्याप्रमाणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी सर्व शाखाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांना तसे कळवले आहे. याआधीच्या बहुसंख्य निवडणुकांमध्ये मनसेने सातत्याने तटस्थतेची भूमिका स्वीकारली होती. किमान या निवडणुकीत तरी मनसेने तटस्थ राहू नये, असे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे म्हणणे होते. राजकीय पक्ष म्हणवून घ्यायचे आणि निवडणूक लढवायची नाही, अशी भूमिका या पदाधिकाऱ्यांची होती.
एका पदाधिकाऱ्याने सांगितले की, मनसेचे पुण्यात काही पॉकेट्स आहेत. वसंत मोरे बाहेर पडले. त्यानंतर त्यांचे फेसबुक लाइक्स व कमेंटची संख्या लक्षणीय घटली आहे. त्यामुळे ते गेले याचा अर्थ मनसेची मते जातील, असा नाही. राज यांना मानणारा बराच मोठा युवा वर्ग शहरात आहे. महापालिका सभागृहात मनसेचे २९ नगरसेवक होते. विधानसभा निवडणूक लढवणारे मनसेचे किशोर शिंदे यांना भाजपचे उमेदवार चंद्रकात पाटील यांच्या विरोधात ८० हजार मते मिळाली होती. त्यामुळे मनसेला कोणी स्वस्तात घेऊ नये, असे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
महापालिका निवडणुकीत हाेणार फायदा :
महापालिका निवडणूक लक्षात घेऊन मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते महायुतीत जाण्याच्या राज यांच्या निर्णयाकडे पाहतात. महापालिका निवडणुकीत ४ किंवा ३ चे पॅनल असते. महायुती पुढेही राहिली तर महापालिका निवडणुकीत या महायुतीचा चांगला फायदा होऊ शकतो, असे स्थानिक पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
मनसेच्या कोणाही पदाधिकारी किंवा कार्यकर्त्यांसाठी राज यांचा आदेश महत्त्वाचा असतो. इतके दिवस तटस्थ राहणाऱ्या मनसेला अचानक महायुतीत जाण्यासंबंधी निर्णय घ्यावा लागणे, याचा अर्थ मी वेगळा सांगण्याची गरज नाही.
- हेमंत संभूस, राज्य सरचिटणीस, मनसे