Raj Thackeray: ...अन्यथा महाराष्ट्र तहानलेलाच राहिल, मनसेच्या 'या' नेत्यानं उचलला पाणीप्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2022 12:48 PM2022-05-05T12:48:35+5:302022-05-05T12:55:18+5:30
देशात महागाईने जनता त्रस्त झाली आहे. मागील काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीबरोबर एलपीजी गॅसच्या किंमतीतही वाढ झाली आहे.
मुंबई - राज्यात आणि देशात सध्या भोंग्याचे राजकारण सुरू आहे. मनसेने सुरू केलेल्या या आंदोलनावर विविध पक्ष त्यांच्या सोईने प्रतिक्रिया देत आहेत. पण, याच भोंग्याच्या राजकारणात दुसऱ्या बाजूला सामान्यांच्या दृष्टीने अनेक महत्त्वाचे निर्णय झाले आहेत. तर, सर्वसामान्यांचे महत्त्वाचे प्रश्नही अडगळीत पडले आहेत. राज्यातील या भोंग्याच्या राजकारणामुळे अनेकांचं त्याकडे लक्ष गेले नाही. विशेष म्हणजे मनसेच्या नेत्यानेही या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे. पुण्यातील मनसेचे नेते अनिल शिदोरे यांनी ट्विट करुन गंभीर प्रश्नावरुन महाराष्ट्राची गरज व्यक्त केली आहे.
देशात महागाईने जनता त्रस्त झाली आहे. मागील काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीबरोबर एलपीजी गॅसच्या किंमतीतही वाढ झाली आहे. विशेष म्हणजे मे महिन्यात एलपीजी गॅसच्या किमतीत 102.50 रुपयांनी वाढ झाली आहे. एलपीजी गॅसच्या वाढत्या किंमतीमुळे सामान्यांच्या खिशावर प्रत्यक्ष परिणाम पडणार आहे. कोरोनाच्या लाटेनंतर सामान्यांचे आर्थिक गणित कोलमडलेले असताना या वाढत्या महागाई तोंड देताना सामान्यांची परवड होत आहे. तर, दुसरीकडे मे महिन्याचा उन्हाळा सुरू झाल्याने पाण्याची गंभीर समस्या समोर येत आहे. मराठवाडा, विदर्भात भोंग्यापेक्षा पाण्याचा प्रश्न लोकांना महत्त्वाचा वाटतो.
मनसेचे नेते अनिल शिदोरे नेहमीच सामाजिक विषय घेऊन सोशल मीडियावर सक्रीय असतात. सध्या मनसेकडून राज्यात भोंगावाद, भोंगानाद सुरू असताना त्यांनी पाण्याच्या गंभीर समस्येकडे महाराष्ट्राचे लक्ष वेधले आहे. पाणी समस्येवर महाराष्ट्राने ठोस निर्णय घ्यायला हवा, अन्यथा महाराष्ट्र तहानलेलाच राहिल, असेही त्यांनी म्हटलंय.
अगदी उत्तम पाऊस झालेल्या वर्षातही मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात महाराष्ट्रात पाणीटंचाई जाणवणं ही काही चांगली गोष्ट नाही.. कल्पना करा, एखाद्या वर्षी पाऊसपाणी अगदी कमी झालं तर काय होईल? pic.twitter.com/Oyz7hZWdYd
— Anil Shidore अनिल शिदोरे (@anilshidore) May 5, 2022
''अगदी उत्तम पाऊस झालेल्या वर्षातही मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात महाराष्ट्रात पाणीटंचाई जाणवणं ही काही चांगली गोष्ट नाही.. कल्पना करा, एखाद्या वर्षी पाऊसपाणी अगदी कमी झालं तर काय होईल?. महाराष्ट्रात पाणीवाटप नीट केलं नाही केलं तर भरपूर पाऊस पडूनही टंचाई रहाणार. उदाहरणार्थ, उस… लागवड ४ टक्क्यांहून कमी पण सिंचनासाठी असलेलं ७० टक्के पाणी त्यावर खर्च होतं. महाराष्ट्रानं ह्यावर ठोस निर्णय घेतला पाहिजे, नाहीतर महाराष्ट्र तहानलेला तो तहानलेलाच राहील.'', असे मत मनसेचे नेते अनिल शिदोरे यांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान, भोंग्यापेक्षा वाढती महागाई, पाणीसमस्या, बेरोजगारी, वाढती गुन्हेगारी हे महाराष्ट्रासमोर गंभीर प्रश्न आहेत. मात्र, सध्या राज्यासह देशात धार्मिक बाबींवर राजकारण केलं जात असून सर्वसामान्यांना ते आवडताना दिसत नाही. त्यामुळेच, सोशल मीडियातून युवा वर्ग मोठ्या प्रमाणात यावर व्यक्त होत आहे.