"वयाने मोठा असणारा बाप असतो हे राज ठाकरेंनी लक्षात घ्यावे", पुण्यातून संभाजी ब्रिगेडचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 02:22 PM2022-04-13T14:22:01+5:302022-04-13T14:22:29+5:30
वादग्रस्त भाषे प्रकरणी राज ठाकरेंवर तात्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे संभाजी
पुणे : राज ठाकरे यांना वादग्रस्त भाषण करून जर महाराष्ट्र पेटवण्याची भाषा होत असेल, महाविकास आघाडी सरकार व गृहमंत्री डोळे बंद करून राज्यातील तमाशा पाहणार असतील तर हे राज्याचे दुर्दैव आहे. यामुळे जर महाराष्ट्राचे सामाजिक वातावरण घडूळ झाले. तर राज्य सरकार राज ठाकरे यांना अटक करणार का...? सवाल पुण्यातून संभाजी ब्रिगेडने उपस्थित केला आहे. तर वादग्रस्त भाषे प्रकरणी राज ठाकरेंवर तात्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे. अशी मागणीसुद्धा त्यांनी केली आहे.
संभाजी ब्रिजेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे म्हणाले, राज ठाकरेंच्या गाडीत पेट्रोल/डिझेल कोण भरतं, त्यांच्या घरातला गॅस सिलेंडर कुण्याच्या पैशानी पुरवला जातो. त्यांच्या कार्यकर्त्यांची घरं कशी चालतात...? महागाई एवढी वाढलेली असताना मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या घरातील चुली कोण पेटवतो...? कारण सध्याची भयंकर महागाई पाहता, राज ठाकरे महागाईवर बोलायला तयार नाही. नरेंद्र मोदी व भाजपची ते किती दलाली करत आहेत म्हणून गप्प आहेत. खोटा इतिहासाचा संदर्भ देऊन ते महाराष्ट्राची दिशाभूल करत आहेत. राज ठाकरेंना महाराष्ट्रात दंगली घडवायच्या आहेत असा आरोप त्यांनी यावेळी केला आहे.
वयाने मोठा असणारा बाप असतो
संभाजी ब्रिगेडचा जन्म 1995 चा आहे. त्यानंतर चार वर्षांनी राष्ट्रवादी जन्माला आली आणि 2006 ला मनसे बाळूत्यात होती. याचा अर्थ वयाने मोठा असणारा बाप असतो, हे राज ठाकरे यांनी लक्षात घ्यावे. जो व्यक्ती स्वतःच्या आजोबाचा होऊ शकत नाही तो व्यक्ती महाराष्ट्राचा काय होणार. फक्त 'टोलधाड' टाकून पैसे कमावणार यापेक्षा नवीन काही नाही. इतिहासाचं ब्राह्मणीकरण करून खोटा इतिहास सांगणाऱ्या माणसाची किती लाचारी करायची हे लक्षात आले. खरंतर यांचा वैचारिक डीएनए तपासणे गरजेचे आहे.
आमच्या नादी लागू नका
राज ठाकरे पेट्रोल/डिझेल, गॅस, इंधन दरवाढ दिसत नाही. मात्र पुरंदरेची चमचेगिरी दिसते. संभाजी ब्रिगेड प्रबोधनकार ठाकरे यांचा वैचारिक वारसा जपते. त्यांच्या विचारांनी काम करते. संभाजी ब्रिगेड हे आग्या मोहोळ आहे, आमच्या नादी लागू नका असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे.