Raj Thackeray Video: मला एकच गोष्ट खटकली, अखेर मनसैनिक वसंत मोरेंच्या अश्रूंचा बांध फुटला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2022 02:46 PM2022-04-08T14:46:07+5:302022-04-08T15:00:51+5:30
वसंत मोरेंचं शहराध्यक्ष पद गेल्यानंतर शहर कार्यालयावर जो जल्लोष झाला. तो जल्लोष 9 जुलै 2021 मध्ये झाला होता
पुणे - मनसेप्रमुखराज ठाकरेंच्या गुढी पाडवा मेळाव्यातील भाषणानंतर मनसेतही चांगलीच खळबळ माजली आहे. गेल्या दोन दिवसांपासून पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे यांनी राज्याचे राजकारण दणाणून सोडले आहे. मशिदीवरील भोंग्यांवरून राज ठाकरेंनी घेतलेल्या भुमिकेविरोधात भूमिका घेतल्याने मोरेंची काल मनसेने शहराध्यक्ष पदावरुन हकालपट्टी केली. त्यांच्याजागी बाबर यांना मनसेचे पुणे शहर अध्यक्ष बनविण्यात आले. आता वसंत मोरे यांना राष्ट्रवादी, शिवसेनेकडून ऑफर येऊ लागल्या आहेत. मात्र, आजही ते मनसेवर ठाम आहेत. पण, माध्यमांशी बोलताना आज त्यांना अश्रू अनावर झाले होते.
''वसंत मोरेंचं शहराध्यक्ष पद गेल्यानंतर शहर कार्यालयावर जो जल्लोष झाला. तो जल्लोष 9 जुलै 2021 मध्ये झाला होता, ज्यादिवशी मी त्या पक्ष कार्यालयाचं उद्घाटन केलं होतं. पण, काल मला एक बाब खटकली, ती म्हणजे वसंत मोरेचं पद गेल्यानंतर फटाके वाजले, आनंदोत्सव साजरा झाला, मिरवणूक निघाल्या, असं का?'' असा प्रश्न वसंत मोरेंनी विचारला. विशेष म्हणजे माझे सगळेच कार्यकर्ते, मित्र आणि पदाधिकारीही म्हणतात वसंत मोरे आल्यापासून पक्षात जान आली, पक्ष वाढला आहे. मग, मी एवढे वर्षे पक्षासाठी जे केलं, त्यावर पाणी फिरलं की काय, असं मला वाटतंय, असेही वसंत मोरेंनी म्हटलं.
एक लोकप्रतिनिधी म्हणून माझं ते स्टेटमेंट आलं होतं. पण, मी आजपर्यंत पक्षाच्याविरोधात काहीही केलं नाही. पक्षाचे काही झारीतील शुक्राचार्य आहेत, त्यांची तक्रारी मी राज ठाकरेंकडे केली आहे, पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडेही केली आहे. मात्र, त्यांच्यावर कारवाई न करता, माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर कारवाई झाली. आज माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यासाठी मुस्लीम लोकं रस्त्यावर उतरले. एका हिंदुच्या समर्थनासाठी मुस्लीम पुढे सरसावल्याने मीही भारावलो होतो.
मी राज ठाकरेंना मेसेज केला होता, मी मुंबईत येऊ की ठाण्यात भेटायला येऊ, अशी विचारणा केली. मात्र, दुसऱ्या दिवशीपर्यंत मला त्यांचा कसलाही रिप्लाय आला नाही. आजपर्यंत असं कधीच झालं नाही. 27 वर्षे काय केलं हे कळत नाही, असे म्हणताना वसंत मोरेंच्या डोळ्यात अश्रू आले. वसंत मोरेंचं पद काढल्यानंतर फटाकड्या वाजतात, लोकांना आनंद होतो, असे म्हणत त्यांना भावना अनावर झाल्याचे दिसून आले.
शिवसेना-राष्ट्रवादीची ऑफर
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी देखील मोरेंना पक्षात येण्याची ऑफर दिली आहे. तर उद्धव ठाकरे यांनी मोरेंना मुंबईत भेटायला या, असा थेट निरोप धाडला आहे. दुसरीकडे मोरेंनी राज ठाकरेंची भेट मागितली आहे. परंतू राज यांनी अद्याप प्रतिसाद दिलेला नाही. यामुळे वसंत मोरे मुंबईला जाणार का?, पण कोणाकडे मातोश्रीवर की शिवतीर्वथवर अशी चर्चा रंगली आहे. मोरेंना अद्याप तरी मनसे सोडणार असल्याचे वक्तव्य केलेले नाही.
मनसेचा दुसरा फायरब्रँड नेता...
मुंबईतील नितीन नांदगावकर देखील मनसेचे फायरब्रँड होते. त्यांच्यासारखेच काम वसंत मोरेंचे पुण्यात होते. नांदगावकर बहुतांशवेळी उत्तर भारतीयांविरोधात, मराठी माणसांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात कायदा हातात घ्यायचे. अखेर नांदगावकर यांना शिवसेनेने फोडले. आता पुण्यातील मनसेचे वसंत मोरे शिवसेनेच्या वाटेवर गेले तर मनसेसाठी हा मोठा धक्का ठरणार आहे.