साहित्यिकांनो, मराठी बाणा दाखवा; राजकारण्यांचे कान धरून त्यांना समजवा! राज ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2024 06:55 AM2024-10-08T06:55:32+5:302024-10-08T06:55:56+5:30
आज राजकारणाचे प्रचंड अध:पतन झालेले आहे. या राजकारण्यांना केवळ साहित्यिक लोकच सुधारू शकतात. साहित्यिकांनी राजकारण्यांना योग्य दिशा देण्याचे काम करावे, असे खडेबोल राज ठाकरे यांनी साहित्यिकांना सुनावले.
लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे : ‘आज राजकारणाचे प्रचंड अध:पतन झालेले आहे. त्यामध्ये चॅनलवाल्यांकडून भर घातली जाते. हा नेता काय बोलला आणि तो नेता काय बोलला, यावरच ते प्रतिक्रिया घेतात. आज राजकारण्यांची भाषा खालच्या स्तराला गेली आहे. या राजकारण्यांना केवळ साहित्यिक लोकच सुधारू शकतात. त्यांना बोलू शकतात. त्यामुळे साहित्यिकांनी आपला मराठी बाणा दाखवून राजकारण्यांना योग्य दिशा देण्याचे काम करावे’, असे खडेबोल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी साहित्यिकांना सुनावले.
दिल्ली येथे होत असलेल्या आगामी ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण ठाकरे यांच्या हस्ते सोमवारी झाले. याप्रसंगी माजी संमेलनाध्यक्ष प्रा. सदानंद मोरे, श्रीपाल सबनीस, लक्ष्मीकांत देशमुख, मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, सरहदचे संजय नहार, साहित्य महामंडळाचे प्रकाश पागे, सुनीताराजे पवार आदी उपस्थित होते.
राज ठाकरे म्हणाले, ‘मी माझ्या आयुष्यातील सर्वात छोटे भाषण आज करणार आहे. साहित्यिकांसमोर आम्ही काय बोलावे? ज्यांचे आम्ही ऐकायचे, त्यांना आम्ही काय बोलणार! मसापच्या सभागृहातील साहित्यिकांचे फोटोच सर्व सांगत आहेत की, महाराष्ट्राची उज्ज्वल परंपरा काय आहे. काही वर्षांपासून मी साहित्यिक पाहत आलो आहे की, ज्यांच्यात मराठी बाणा होता, तो आता दिसत नाही. योग्य वेळी राजकारण्यांना ठणकावून सांगण्याची धमक, हिंमत आज मला कमी दिसत आहे.
ट्रोल केले जाते, त्याचा विचार नको राजकारण्यांचे कान धरून, त्यांना समजावून सांगण्याचे कर्तव्य साहित्यिकांचे आहे. तुम्ही अधिकारवाणीने सांगू शकता, मग आम्ही बोललं तर ट्रोल केले जाते, असं म्हणाल, पण त्याचा विचार करू नका. मलापण ट्रोल केले जाते, मी ते पाहत नाही. आपण आपलं काम करावं, असा सल्लाही त्यांनी दिला.
‘महाराष्ट्राची सर्कस झाली’
आजचा महाराष्ट्राचा झालेला सर्व खेळ, महाराष्ट्राचे झालेले अध:पतन प्रचंड आहे. महाराष्ट्राची सर्कस झाली आहे. कोणी विदुषकासारखे चाळे करतेय, तर कोणी जाळ्यांवर उड्या मारतेय, खरंतर अशा राजकारण्यांना जाळ्यांशिवायच्या इमारतीवरून उड्या मारायला सांगायला हवे!, असे राज ठाकरे म्हणाले.