राजकारणात कुठलेही नवनिर्माण करता न आलेल्या राज ठाकरेंना पुरंदरेंच्या पलीकडे इतिहासाचे आकलन नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 11:24 AM2021-08-16T11:24:45+5:302021-08-16T11:25:15+5:30
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून टीका
पुणे : राजकारणात कुठलेही नवनिर्माण करता न आलेला आणि राजकारणात सपशेल अपयशी ठरलेला राज ठाकरे हा माणूस आता स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी महाराष्ट्रात पुन्हा एकदा हा सगळा संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न करत दिसत आहे. त्यांना जसे पुरंदरेंच्या पलीकडे इतिहासाचे आकलन नाही, तसेच त्यांना इथल्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक संघर्षाचेही आकलन नाही. अशी टीका संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून केली आहे.
'परंतु हा संघर्ष उभा करत असताना त्यांना १८९९ ते १९९९ या शंभर वर्षाच्या काळात महाराष्ट्रात झालेल्या सांस्कृतिक संघर्षाचा आणि आपले आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांच्या वारशाचा विसर पडला आहे, हे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. त्यांची सध्याची जी काही मांडणी आहे, ती प्रबोधनकार ठाकरेंच्या ब्राह्मणेतर विचारांपासून फारकत घेणारी आणि पुरंदरेंच्या ब्राह्मणी वर्चस्वाच्या विचारणसरणीला जवळ करणारी आहे हे मात्र नक्की ! असेही ते म्हणाले आहेत.
काय म्हणाले होते राज ठाकरे?
महाराष्ट्रात आधीपासूनच जात ही गोष्ट होती. मात्र स्वजातीचा अभिमान इतपतच ती मर्यादित होती. मात्र मागील २० वर्षांपासून लोक स्वत:च्या जातीच्या अभिमानासोबतच इतरांचा तिरस्कार करण्यापर्यंत पोहोचले आहेत आणि राजकीय स्वार्थातून हे सगळं केलं गेलं आहे. जातीचा मुद्दा हा त्यांच्या त्यांच्या नेत्यांच्या आयडेंटीटीचा भाग झाला आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतरच जातीचा मुद्दा हा सर्वार्थाने मोठा झाला आहे,' असं राज ठाकरे म्हणले होते.
राज्यातील जात अस्मितेवर पुढे बोलताना ठाकरे म्हणाले होते की, 'कोण जेम्स लेन? कुठून आला जेम्स लेन? कसलं पुस्तक लिहिलं त्याने? बरं तो काय जॉर्ज बर्नार्ड शॉ होता का? कुठे आहे तो? काय करतो तो? या सगळ्यातून फक्त हे कोणी लिहिलं तर मग हे ब्राह्मणांनी लिहिलं...मग मराठा समाजातील तरुण-तरुणींपर्यंत पोहोचवलं गेलं. हे सगळं डिझाइन आहे,' असं म्हणत राज ठाकरे यांनी काही लोकांनी आपल्या राजकीय स्वार्थासाठी या गोष्टी केल्याचा आरोप केला होता.