'मी मास्क घालतच नाही', असे म्हणणाऱ्या राज ठाकरेंनी अखेर मास्क घातलाच...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 10:20 AM2021-07-21T10:20:52+5:302021-07-21T10:21:55+5:30
Raj Thackeray meet Babasaheb Purandare: शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या भेटीदरम्यान राज ठाकरेंनी मास्क घातला होता.
पुणे: कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून सरकारकडून वारंवार मास्क घालण्यासह कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जाते. पण, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना नेहमीच या नियमांचा विसर पडल्याचं दिसतं. ते सार्वजनिक ठिकाणी मास्क घातलेले दिसत नाहीत. पण, काल(दि.20) पुण्यात मास्क घातलेले राज ठाकरे पाहायला मिळाले.
राज ठाकरे पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. काल संध्याकाळी राज ठाकरे यांनी महाराष्ट्र्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान मी मास्क घालतच नाही, असे जाहीरपणे सांगणाऱ्या राज ठाकरेंनी मास्क लावलेला होता. यावेळी राज यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच, भेटीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भातील एका लेखाबाबत दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. बाबासाहेब पुरंदरे पुढच्याचच आठवड्यात वयाची 99 वर्षे पूर्ण करणार आहेत. त्यांचे वयोमान आणि कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेत राज ठाकरेंनी मास्क लावला होता.
‘मी मास्क घालतच नाही’
सरकारकडून सतत कोरोना नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या जाता. सार्वजनिक ठिकाणी मास्क लावण्यास सांगितले जाते. पण, राज ठाकरे याला अपवाद आहेत. ते नेहमीच कोरोनासंबंधी नियम पायदळी तुडवत विनामास्क फिरताना दिसतात. यापूर्वी, मुंबईत दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कात आयोजित करण्यात आलेल्या मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमात राज यांनी मास्क लावला नव्हता. त्यावेळी ‘तुम्ही मास्क घातलेला नाही’, असे पत्रकारांनी विचारल्यावर ‘मी मास्क घालतच नाही, तुम्हालाही सांगतोय’, असे उत्तर दिले होते.