Raj Thackeray: राज ठाकरेही करणार पुण्यातील पूरग्रस्त भागांची पाहणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2024 11:42 AM2024-07-28T11:42:39+5:302024-07-28T11:43:06+5:30
राज यांचा राजकीय खमकेपणा सर्वांनाच माहीत असल्यामुळे रविवारच्या पुणे दौऱ्यात पूरग्रस्त परिसराची पाहणी केल्यानंतर आता ते काय बोलतील, कोणावर टीका करतील, याची राजकीय वर्तुळात चर्चा
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे रविवारी (दि. २८) पुण्यात पूरग्रस्त भागांची पाहणी करणार आहेत. सिंहगड रस्त्यावरील एकता नगरी परिसर, पुलाची वाडी व अन्य ठिकाणी दुपारी साडेचार वाजता ते भेट देतील. मुंबईत कार्यकर्ता मार्गदर्शन मेळाव्यात विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढविणार असल्याची घोषणा केल्यानंतर राज यांची ही पहिलीच पुणे भेट आहे.
स्थानिक कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर त्यांनी पुण्याची भेट निश्चित केली असल्याचे समजते. कात्रज परिसरातील अनेक सामाजिक कार्यकर्ते यावेळी राज यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार असल्याचे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. कात्रज येथील मनसेचे माजी शहराध्यक्ष व महापालिकेतील त्यांचे गटनेते असलेले माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे सोडून वंचित विकास आघाडीत प्रवेश केला. त्यांच्याकडून लोकसभा निवडणूक लढविली व पराभवानंतर आता त्यांनी शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षात प्रवेश केला आहे. हा प्रवेश स्थानिक मनसे कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला असल्याचे दिसते आहे.
दरम्यान, सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या महापालिकेतील भ्रष्ट कारभारामुळेच पुणे शहरावर पूरस्थिती आल्याची टीका काँग्रेस व अन्य विरोधी पक्षांकडून होत आहे. दुसरीकडे खासदार डॉ. प्रा. मेधा कुलकर्णी यांनी राज्यसभेत बोलताना पुण्याचे काँग्रेसचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे नाव न घेता त्यांच्या कामकाजामुळेच शहराची वाट लागल्याची टीका केली होती. राज यांचा राजकीय खमकेपणा सर्वांनाच माहीत असल्यामुळे रविवारच्या पुणे दौऱ्यात पूरग्रस्त परिसराची पाहणी केल्यानंतर आता ते काय बोलतील, कोणावर टीका करतील, याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिकांतही याबाबत उत्सुकता दिसून येत आहे.