Raj Thackeray: तुमचं तर अजून लग्न झालं नाही, राज ठाकरेंनी राज्यपालांवर डागली तोफ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2022 08:41 PM2022-03-09T20:41:05+5:302022-03-09T20:55:44+5:30
राज ठाकरेंनी भाषणाच्या सुरुवातीला कोरोना कालावधीचा उल्लेख करत लॉकडाऊन महिन्यातून दोनदा लावायला हवा, कधी कधी वाटतं मोदींना त्यासाठी पत्रही लिहावं, असे म्हटले.
पुणे - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १६ वा वर्धापनदिन पुणे शहरातील गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित करण्यात आला आहे. वर्धापनदिनासाठी गणेश कला क्रीडा मंदिर हाऊसफुल झाले आहे. राज्यभरातून हजारोंच्या संख्येने मनसैनिक आणि पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आहेत. राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला होता. त्यावरुन राज ठाकरे यांनी राज्यपालांना टोला लगावला. तसेच, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाई फुले यांच्या लग्नाबद्दल राज्यपालांनी केलेल्या भाष्यावरही त्यांनी प्रहार केला.
राज ठाकरेंनी भाषणाच्या सुरुवातीला कोरोना कालावधीचा उल्लेख करत लॉकडाऊन महिन्यातून दोनदा लावायला हवा, कधी कधी वाटतं मोदींना त्यासाठी पत्रही लिहावं, असे म्हटले. त्यानंतर, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि सावित्रीबाई फुलेंसंदर्भात केलेल्या वक्तव्याचा समाचारही घेतला. कुणीतरी मला दाखवलं, ते इतने इतने छोटे थे कैसे शादी हो गयी मरे को पता नाही... तेव्हा लहानपणी व्हायची लग्न. तुमचं अजून नाही झालं... असे म्हणत राज ठाकरेंनी राज्यपाल कोश्यारींवर निशाणा साधला. यावेळी, उपस्थित प्रेक्षकांनी जल्लोष करत राज यांच्या भाषणाला दाद दिली.
शिवाजी महाराज-रामदास स्वामींबद्दलही राज बोलले
राज ठाकरे म्हणाले, राज्यपालांना शिवाजी महाराज, रामदास स्वामी काही माहिती आहे का. नुसती भांडण लावायची, एकाच शौर्य आणि एकाची विद्वत्ता कमी करायची. राज्यपाल तुम्हाला रामदास स्वामी, शिवाजी महाराज कळतात का? आपला अभ्यास नसताना आपण बोलून जायचं कि, रामदास स्वामी यांनी जे लिहिलं आहे ते मी माझ्या घरात आहे इतकं चांगला महाराज यांच्या बद्दल लिहलंय ते कोणीच लिहलेले नाही.
निश्चयाचा महामेरू। बहुत जनासी आधारू। अखंडस्थितीचा निर्धारू। श्रीमंत योगी।। हे रामदास स्वामींनी महाराजांबद्दल लिहिलंय. मात्र, असं उगाच काहीतरी सांगायचं. रामदास स्वामी हे महाराजांचे गुरू होते, असं कुठंही लिहिलेलं नाही, असेही राज यांनी म्हटले. तसेच, सावित्रीमाई फुले यांच्याबदद्लच्या टिपण्णीवरुनही निशाणा साधला.
संकटांना घाबरायचं नसतं
लॉकडाऊनमध्ये कोकिळाही कुहू कुहूऐवजी कोविड कोविड... असं ओरडायला लागल्या होत्या. त्या वातावरणात भीती होती, पण कुटुंब जवळ आली. सर्वजण एकमेकांसोबत जेवायला लागली, एकमेकांची काळजी करायला लागली, असे म्हटले. संकटे येत असतात, संकटे येताना हातात हात घालून येत असतात. आमच्यावर अजूनही संकटे आहेत, आमच्या पक्षावर अजूनही संकट आहेत. पण, अशा संकटांना घाबरायचं नसतं, संकटांची एक वेगळीच मजा असते, असे म्हणत कोविडच्या आठवणी जागवत राज यांनी आता नव्या जोमाने संकटांवर मात करुन पुढे जाण्याचा सल्ला सर्वांनाच दिला.