राज ठाकरेंची पुण्यातील सभा रद्द; काय आहे नेमके कारण?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 06:26 PM2022-05-18T18:26:52+5:302022-05-18T19:08:16+5:30
सभा रद्द झाल्याचं पत्र मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून पाठवण्यात आले...
पुणे :महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची २१ मेला पुण्यात होणारी सभा रद्द झाली आहे. राज ठाकरे पुण्यातील मनसैनिकांना संबोधित करणार होते. परंतु पावसाचं कारण देत ही सभा रद्द करण्यात आली असल्याचं सुत्रांकडून कळतंय. मनसेकडून डेक्कन पोलिसांना सभा रद्द झाल्याचं पत्र मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून पाठवण्यात आले आहे. येत्या शनिवारी राज ठाकरेंची सभा मुठा नदी पात्रात होणार होती.
येत्या १० दिवसांच्या आत राज ठाकरेंची सभा पुण्यात होईल. शनिवारी हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवल्याने राज ठाकरेंच्या सभेचा दिवस बदलण्यात आला असल्याचे सुत्रांकडून समजतंय. उद्या स्वतः राज ठाकरे पुण्यातील सभेबद्दल माहिती देतील असंही सांगण्यात आले आहे.
राज ठाकरे यांच्या जाहीर सभेचे आयोजन शनिवारी २१ मेला डेक्कन जिमखाना येथील मुठा नदी पात्रातील जागेत पुणे शहर मनसे कडून करण्यात आले होते. त्याकामी मनसेच्या वरिष्ठ नेत्यांनी दिलेल्या आदेशानुसार पुणे शहरात सभेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती पुणे शहर सरचिटणीस अजय शिंदे यांनी पत्रकाद्वारे दिली होती.
पुढील आठवड्यात राज ठाकरेंचा पुणे दौरा निश्चित झाला होता. त्यानिमित्ताने २१ ते २८ मे दरम्यान त्यांचा पुणे दौरा होणार असून याच कालावधीत पुणे शहरातील सर परशुरामभाऊ महाविद्यालय येथे राज ठाकरेंची सभा होणार असल्याची माहिती मनसे पदाधिकाऱ्यांनी दिली होती. त्यासाठी पुणे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांनी पोलीस आयुक्तांना परवानगीचे पत्र पाठवले होते. पुणे शहरातील सर परशुरामभाऊ महाविदयालय येथे सभेचे आयोजन करण्यात येणार होते. पण वाहतूक समस्या निर्माण होऊ नये. या दृष्टीने डेक्कन जिमखाना येथील मुठा नदी पात्रातील जागा निश्चित करण्यात आली असल्याचे अजय शिंदे यांनी सांगितले होते.