राज ठाकरेंचं नाव येताच वसंत मोरेंच्या अश्रूंचा बांध फुटला; नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2022 03:11 PM2022-04-08T15:11:46+5:302022-04-08T15:27:31+5:30
वसंत मोरे यांना शहराध्यक्षपदावरून काढण्यासाठी कुणी प्रयत्न केले?
पुणे : गुढीपाढव्याच्या दिवशी राज ठाकरेंच्या (raj thackeray) भाषणातील काही मद्द्यावरून पुण्याचे मनसे नेते वसंत मोरे (vasant more) यांनी नाराजी दर्शवली होती. पुण्यातही अनेक ठिकाणी राज ठाकरेंच्या विधानावरून निदर्शने झाली. त्यानंतर पुणेमनसेमध्ये मोठ्या हालचाली होऊन वसंत मोरेंचे शहराध्यक्षपक्ष काढून साईनाथ बाबर यांच्याकडे ते पद देण्यात आले. 'पक्ष म्हणून मी राज ठाकरेंच्या सोबत आहे पण लोकप्रतिनिधी म्हणून मी त्यांचे विधानाचे समर्थन करणार नाही', असंही मोरे म्हणाले होते. त्यानंतर लगेच मोरेंना शहराध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला.
पुणे शहरात मनसेच्या पक्षवाढीसाठी वसंत मोरे यांनी मोठे प्रयत्न केले आहेत. तसेच ते पुण्यातील प्रसिद्ध नगरसेेवक आहेत. कोरोनाच्या काळात मोरे यांचे काम कौतुकास्पद ठरले होते. त्यांच्यावर कारवाई झाल्यानंतर अजूनपर्यंत राज ठाकरेंनी त्यांचा फोन घेतला नाही तसेच मेसेजला रिप्लायही केला नाही. गेली दोन दशकांपेक्षा राज ठाकरेंसोबत मी असूनही अशी वागणूक मला पक्षात मिळत आहे, असं म्हणत वसंत मोरे यांच्या अश्रूचा बांध फुटला. मोरेंवरील कारवाईनंतर इतर पक्षांतून त्यांना ऑफर येत आहेत.
'माझ्या राजीनाम्यानंतर पक्षकार्यालयात जल्लोष...'
याच मुद्द्यावर लोकमतच्या प्रतिनिधीसोबत बोलताना वसंत मोरे म्हणाले, सत्तावीस वर्ष राज साहेबांसोबत होतो. साई आणि वसंत मोरे हे एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत. त्याच्याबद्दल मला काहीच अडचण नव्हती. पण वसंत मोरेचे शहराध्यक्ष पद गेल्यानंतर शहर कार्यालयावर जो जल्लोष झाला तो मला खटकला. माझे पद गेल्यानंतर फटाका का वाजल्या, गुलाल उधळला गेला. आजपर्यंत मी कोणतीच गोष्ट पक्षाच्या विरोधात केली नव्हती. ज्या कार्यकर्त्यांनी माझे पद गेल्यानंतर जल्लोष केला ती बाब माझ्या मनाला लागल्याची भावना मोरे यांनी व्यक्त केली.
वसंत मोरे यांना शहराध्यक्षपदावरून काढण्यासाठी कुणी प्रयत्न केले?
यावर बोलताना मोरे म्हणाले, त्या सर्व झारीतल्या शुक्राचार्यांची नावे मी राज ठाकरे यांना सांगितली आहेत. या लोकांवरती कारवाई न करता माझ्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्यावर करणे योग्य आहे का? कदाचित भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच असं झालं असेल की एका हिंदू नेत्यासाठी मुस्लीम लोक रस्त्यावर आले होते.
राज ठाकरेंचे बोलणे झाले का?
या प्रश्नावर बोलताना मोरे म्हणाले, मी साहेबांना काल मेसेज केला होता पण त्याला अजून रिप्लाय आला नाही. आतापर्यंत असं कधीच झालं नव्हतं. सत्तावीस वर्ष मी साहेबांसोबत होतो, पण आता मलाच काही कळत नाही करावं...' हे बोलताना वसंत मोरेंना अश्रू अनावर झाले होते.