‘राजसाहेब’ पुण्यात आले...पण कार्यकर्त्यांना भेटलेच नाहीत :
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 08:46 PM2021-03-12T20:46:09+5:302021-03-12T20:47:45+5:30
दिवसभर पाहिली निरोपाची वाट : नियुक्तीपत्र नेत्याच्या हातून मिळण्याची होती अपेक्षा
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहरातील पक्षसंघटनेमध्ये फेरबदल करण्यात आले असून संघटनात्मक पातळीवर ‘नवचैतन्य’ आणण्यासाठी नवनियुक्त पदाधिका-यांना मनसेप्रमुखराज ठाकरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात येणार होते. त्यामुळे कार्यकर्ते उत्साहात होते. परंतु, पुण्यात आलेल्या राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना भेटीची वेळ दिली नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या उत्साहावर विरजन पडले.
मनसेच्या शहराध्यक्ष बदलानंतर 45 जणांची कार्यकारिणी जाहिर करण्यात आली. नवीन कार्यकारिणीमध्ये उपशहर अध्यक्ष, शहर सचिव, शहर संघटक, विभाग अध्यक्ष, विभाग सचिव, कार्यालयीन कामकाज, प्रसार माध्यम सचिवांच्या नेमणूका करण्यात आल्या आहेत. या सर्वांना ठाकरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात येणार असल्याचे शहराध्यक्ष वसंत मोरे आणि नेते बाबू वागस्कर यांनी जाहिर केले होते.
त्यामुळे उत्साहात असलेल्या नवनियुक्त पदाधिका-यांनी आपापल्या भागातील तसेच संभाव्य प्रभागातील कोणकोणत्या रस्त्यांवर, कोणकोणत्या चौकात बॅनर लावायचे, राज ठाकरे यांच्यासोबतचे फोटो असलेले होर्डींग उभारायचे, जाहिरात-प्रसिद्धी याचे नियोजन केले होते. काही जणांनी तर ‘सोशल मिडीया टीम’लाही सज्ज ठेवलेले होते. शुक्रवारी ठाकरे पुण्यात येणार असल्याने सर्व पदाधिकारी तयारीत होते. पक्षीय पातळीवरुन केव्हाही निरोप येऊ शकतो अशी शक्यता गृहीत धरुन सर्वजण ‘निरोपा’ची वाट पहात होते. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साहेबांनी सर्व नियोजित कार्यक्रम रद्द केल्याचा निरोप सरतेशेवटी मिळाला. त्यामुळे कार्यकर्ते काहीसे नाराज झाल्याचे पहायला मिळाले.
----
शहरात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत चालली आहे. त्यापार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शुक्रवारचा नियोजित कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नवनियुक्त पदाधिका-यांचा मेळावा त्यांच्या उपस्थितीत घेण्यात येणार आहे.
- वसंत मोरे, शहराध्यक्ष, मनसे