डिनर डिप्लोमसीचा ‘राज’योग

By admin | Published: January 20, 2016 01:30 AM2016-01-20T01:30:59+5:302016-01-20T01:30:59+5:30

साहेबांना भेटायचं तर कुणी त्यांच्याशी थेट संपर्क साधूच देत नाही... पुण्यात आले तर ते ठराविक पदाधिकाऱ्यांनाच वेळ देतात..

The 'Raj' work of dinner diplomacy | डिनर डिप्लोमसीचा ‘राज’योग

डिनर डिप्लोमसीचा ‘राज’योग

Next

पुणे : साहेबांना भेटायचं तर कुणी त्यांच्याशी थेट संपर्क साधूच देत नाही... पुण्यात आले तर ते ठराविक पदाधिकाऱ्यांनाच वेळ देतात.. आमच्या तक्रारी असूनही त्यांच्याकडे लक्ष द्यायला साहेबांना वेळच नाही. त्यामुळे पक्षात राहून काय करणार, असे जाहीरपणे बोलत मनसेचा झेंडा खांद्यावरून उतरवून भाजपचा झेंडा खांद्यावर घेण्याच्या तयारीत असलेल्या मनसेच्या नगरसेवक तसेच पदाधिकाऱ्यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबतची आगळीवेगळी डिनर डिप्लोमसी रोखणार का, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
महापालिकेच्या निवडणुका अवघ्या वर्षभरावर आल्या आहेत. या निवडणुकीसाठी पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी मागील आठवड्यात ठाकरे यांनी पुण्यात प्रमुख पदा़धिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यात काही शहर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ताही केल्या आहेत. २0११ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळून २00७ मध्ये दहाच्या आत असलेल्या मनसेच्या नगरसेवकांची संख्या २८ वर पोहोचली होती. मात्र, गेल्या चार वर्षांत पक्षाला महापालिकेत तटस्थ म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. त्यातच मागील वर्षी झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही पक्षाला चांगलाच धक्का बसल्याने त्याचे पडसाद महापालिका निवडणुकीवर पडण्याची शक्यता आहे. त्यातच गेल्या काही वर्षांत पक्षातील नगरसेवकांमध्ये गटातटाचे राजकारण सुरू असल्याने आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने अनेक पदाधिकारी तसेच नगरसेवक पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत. असे असतानाच मागील आठवड्यात ठाकरे यांनी ५ प्रांत उपाध्यक्ष, २ शहराध्यक्ष, ४ उपशहराध्यक्ष, ७ विभाग अध्यक्ष तसेच चार ते पाच नगरसेवकांसह चक्क अनौपचारिक गप्पांचा कार्यक्रम ठेवला. यासाठीची जबाबदारी एका नाराज नगरसेवकाकडे देण्यात आली. एरवी दम भरणाऱ्या ठाकरे यांनी चक्क मिस्कील शैलीत गप्पा मारत प्रत्येकाची विचारपूस केली. तर अनेकांची मस्करीही केली. त्यामुळे ठाकरे यांच्या या आगळ्यावेगळ्या भेटीने हे पदाधिकारी भारावून गेले होते. या वेळी या हॉटेलात आलेल्या अनेकांना ठाकरे यांच्यासोबत छायाचित्र काढण्याचा मोह आवरला नाही. त्यांनाही आपल्या खास ठाकरी शैलीत मिस्कील कोपरखळ्या मारत ठाकरे यांनी त्यांच्यासमवेत फोटो काढले.

Web Title: The 'Raj' work of dinner diplomacy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.