सुरेश कलमाडींचे स्वीय सहायक राजा महाजन यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2019 10:37 AM2019-06-20T10:37:51+5:302019-06-20T10:38:33+5:30
सुरेश कलमाडी यांचे स्वीय सहायक म्हणून राजा महाजन यांनी सुमारे 30 वर्षे काम केले.
पुणे : काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते, माजी मंत्री सुरेश कलमाडी यांचे स्वीय सहायक राजा शंकर महाजन (वय 62) यांचे अल्पशा आजाराने आज पहाटे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, सून व नात असा परिवार आहे. त्यांच्यावर सकाळी साडेअकरा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
सुरेश कलमाडी यांचे स्वीय सहायक म्हणून राजा महाजन यांनी सुमारे 30 वर्षे काम केले. पुणे फेस्टिवल, पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन, पुणे फिल्म फेस्टिवल यांच्या नियोजनात त्यांचा सहभाग असायचा. 1985 मध्ये युवक काँग्रेसतर्फे सोव्हियत युनियनचा अभ्यास दौरा त्यांनी केला होता. ब्राम्हण सेवा संघाचे ते संस्थापक सदस्य होते. तसेच मराठी भाषा संवर्धन प्रतिष्ठानचे ते उपाध्यक्ष होते. टेलिफोन सल्लागार समितीवरही त्यांनी दीर्घकाळ काम केले. अत्यंत मनमिळावू स्वभावामुळे सर्वच राजकीय पक्षांमध्ये तसेच सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रामध्ये त्यांचा मोठा मित्र परिवार होता. मधुमेहाच्या त्रासाने ते आजारी होते. त्यात त्यांच्या पायाला जखम झाली. 27 मे रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मधुमेहाचा परिणाम त्यांच्या शरीरातील अवयवांवर झाला होता. त्यातूनच त्यांचे निधन झाले.