अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी राजन खान यांचा अर्ज दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2017 08:05 PM2017-10-10T20:05:39+5:302017-10-10T20:05:58+5:30
बडोदा येथे होणाऱ्या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी लेखक राजन खान यांनी मंगळवारी महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला.
पुणे : बडोदा येथे होणाऱ्या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी लेखक राजन खान यांनी मंगळवारी महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला. कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्याकडे अर्ज सुपूर्त केला.
खान यांच्या अर्जावर सूचक म्हणून लेखक संजय भास्कर जोशी यांची, तर अनुमोदक म्हणून संतोष शेणई, संदेश भांडारे, भारत देसडला, रमेश राठीवडेकर आणि गोपाळ कांबळे यांच्या स्वाक्षरी आहेत.
खान म्हणाले, 'संमेलनाध्यक्षपद एका वर्षासाठी नव्हे तर आयुष्यभरासाठी नसते. मी पूर्ण तयारीनिशी निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहे. तरीही कोणतेही आदरणीय, ज्येष्ठ नाव समोर आल्यास माघार घेण्याची माझी तयारी असेल.'
लेखक, कार्यकर्ता म्हणून मी आजवर काम करत आलो आहे. लेखकाची ओळख मर्यादित असते. सम्मेलनाध्यक्ष पदाला महाराष्ट्रात वलय, आदराचे स्थान आहे. त्यामुळे लेखकाच्या कामाला संम्मेलनाध्यक्षपदाच्या वलयाचा निश्चित उपयोग होतो. राज्यात, देशभरात अनेक छोटी संमेलने होत असली तरी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हा महाराष्ट्राचा मानबिंदू आहे. त्यामुळे संमेलनाकडे गांभीर्याने पहायला हवे, असेही ते म्हणाले.
संमेलने खर्चिक होत आहेत, अशी टीका होत असली तरी साहित्याचा सोहळा दिमाखदार होत असेल तर कद्रु तक्रार करण्यात अर्थ नाही. साहित्यासाठी खर्च झालेला पैसा कधीच वाया जात नाही. याउलट, खर्च काळानुसार वाढला पाहिजे, अशी टिपण्णी खान यांनी केली. जात, धर्म बाजूला सारून सर्व लेखकांनी मराठीतील एक कुटुंब म्हणून समान पातळीवर आले पाहिजे. मराठी भाषेने देशाचे भाषिक, राजकीय नेतृत्व केले आहे. त्यामुळे मराठी कधीही मरणार नाही, असेही ते म्हणाले.