राजबिंड्या, रुबाबदार हिरोचा अचानक, दयनीय अवस्थेत अंत ही शोकांतिकाच म्हणायला हवी
By भालचंद्र सुपेकर | Published: July 20, 2023 05:09 PM2023-07-20T17:09:44+5:302023-07-20T17:10:05+5:30
महाजनी यांचा देखणा चेहरा, रुबाबदार अभिनय आणि बोलके डोळे याच्या जोरावर त्यांनी चित्रपटात मजबूत कामगिरी केली
- भालचंद्र सुपेकर
पेन तर हातात घेतलं होतं; पण हे लिहावं की नको, अशा द्विधामन:स्थितीत होतो. आपल्या फेव्हरेट, राजबिंड्या, रुबाबदार हिरोचा असा अचानक, दयनीय अवस्थेत अंत होऊ शकतो, यावर अजूनही विश्वास बसत नाही. मराठी चित्रपटसृष्टीवर आणि अनेक तरुण-तरुणींच्या दिलावर अक्षरश: राज्य करणारा हा अभिनेता रवींद्र महाजनी अशारीतीने काळाच्या पडद्याआड जावा ही शोकांतिकाच म्हणायला हवी.
तुमचा ‘मुंबईचा फौजदार’ बघितला आणि तुमचा ‘फॅन’ झालो. त्यात पोलिसच्या वर्दीत मोटारसायकलवर बसून पडद्यावर येणारी तुमची ती रुबाबदार छबी आजही आठवते. मग तुमच्याविषयी अजून जाणून घ्यायची इच्छा झाली. वाचत गेलो तसं अभिनयाच्या या क्षेत्रात येण्याआधी तुम्ही टॅक्सी ड्रायव्हर म्हणूनही काम केल्याचं कळलं. वाटलं, या माणसाने किती स्ट्रगल केलंय राव. तीन वर्ष टॅक्सी चालवली. टॅक्सी चालवत असतानाही तुम्ही स्वत:मधला कलाकार जिवंत ठेवला. दिवसभर या निर्मात्याकडून त्या निर्मात्याकडे, या चित्रपट कंपनीकडून त्या चित्रपट कंपनीकडे असा स्ट्रगल करत रात्री टॅक्सी चालवली. हे वाचलं तेव्हा तुमच्या त्या ‘स्पिरीट’ला मनोमन सलाम केला होता.
व्ही. शांताराम यांनी तुम्हाला ‘झुंज’मध्ये पहिली संधी दिली. त्यात तुमचा देखणा चेहरा, रुबाबदार अभिनय आणि बोलके डोळे याच्या जोरावर तुम्ही मजबूत कामगिरी केलीत. तीन वर्ष तुमच्यात दडलेल्या कलाकाराच्या पोटातली आग तुम्ही त्या चित्रपटातून दाखवलीत. तुमचा अभिनय थेट प्रेक्षकांच्या हृदयाला भिडला आणि तुम्ही एका रात्रीत अनेक रसिकांच्या मनातले ‘स्टार’ झालात. ‘मुंबईचा फौजदार’ने तर तुम्हाला अलगद ‘सुपरस्टार’ बनवून टाकलं. त्या चित्रपटानंतर तर अनेक तरुणी तुमच्यावर फिदा झाल्या. माझ्यासारख्या तरुणांनाही तुमच्या पर्सनॅलिटीची भुरळ पडली. चित्रनगरीतला तुमचा हा प्रवास पुढेही ‘गोंधळात गोंधळ’ आणि ‘देवता’ अशा अनेक चित्रपटांमधून सुरूच राहिला.
गेली अनेक वर्षं तुम्ही कुठेच नव्हता, रसिकांच्या चर्चेतही नव्हता; पण कुटुंबापासून, स्वत:पासूनही इतक्या दूर गेला असाल असं कधी वाटलंच नाही. त्या दिवशी एकदम ही बातमी वाचली आणि मनात धस्सं झालं. तुमच्या सगळ्या चित्रपटांच्या आठवणी डोळ्यासमोर तरळल्या. मन हळहळलं. तुमची चित्रपटातली कारकीर्द, त्यातले प्रसंग, तुमचा अभिनय हे एक आनंददायी स्मरण होते. पण तुमचा असा दयनीय अंत उरात कायमची जखम बनून राहील.