राजेगावची हरित राजेगावकडे वाटचाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:08 AM2021-06-06T04:08:42+5:302021-06-06T04:08:42+5:30
राजेगाव वृक्ष संवर्धन समितीच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या या मोहिमेत या महिन्यात गावातील विविध ठिकाणी नारळ, पिंपळ, वड, ...
राजेगाव वृक्ष संवर्धन समितीच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या या मोहिमेत या महिन्यात गावातील विविध ठिकाणी नारळ, पिंपळ, वड, चिंच, अशोक, जांबुळ, करंज, बुच, लिंब, बहावा, पळस, कांचन, शिसम, अर्जुन, बकुळ, चेरी, कदंब इत्यादी प्रकारची पाचशे झाडे लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे.
या चळवळीमध्ये वृक्ष, टी-गार्ड, ठिबक साहित्य, पाईपलाईन साहित्य अथवा टँकरने पाणी देऊन सहभागी होणार आहेत. तसेच, काही वृक्षप्रेमी नागरिक स्वतः वृक्ष लावण्यासाठी किंवा वृक्षाला पाणी देण्यासाठी आपला वेळ देऊन या मोहिमेसाठी मदत करणार आहेत.
प्रेमाचं झाड या दुसऱ्या संकल्पने अंतर्गत गावातील दानशूर आपले आई-वडील, भाऊ-बहीण, पत्नी किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या आठवणींसाठी प्रेमाचे प्रतीक म्हणून, तसेच व्यावसायिक ही आपल्या व्यवसायाच्या नावाने आपापल्या ऐपतीप्रमाणे इच्छेनुसार झाड व टी-गार्ड (नावासह) देणार आहेत. अशा पद्धतीने ते झाड पाहून आयुष्यभर आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या आठवणींना एकप्रकारे उजाळाच देणार आहेत.
माझा वाढदिवस- माझे झाड या उपक्रमांतर्गत प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष रमेश शितोळे यांच्या वतीने गावातील ज्याचा वाढदिवस असतो त्याला घरी जाऊन एक रोप भेट दिले जाते. ते रोप वाढदिवसाच्या दिवशी सुंदर आठवण म्हणून लावले जात आहे.
--
फोटो ०५ राजेगाव वृक्षारोपण
फोटो ओळी : राजेगाव (ता.दौंड) येथे माझा वाढदिवस- माझे झाड या उपक्रमा अंतर्गत वाढदिवसाचे औचित्य साधून एक रोप भेट दिले जाते.)