राजेंद्र जगताप स्मार्ट सिटीचे सीईओ

By Admin | Published: June 30, 2017 04:07 AM2017-06-30T04:07:39+5:302017-06-30T04:07:39+5:30

महापालिकेचे माजी अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांची पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Rajendra Jagtap Smart City CEO | राजेंद्र जगताप स्मार्ट सिटीचे सीईओ

राजेंद्र जगताप स्मार्ट सिटीचे सीईओ

googlenewsNext

पुणे : महापालिकेचे माजी अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांची पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिकेतून त्यांची बदली होऊन त्यांना पुणे महानगर परिवहन (पीएमपी)च्या व्यवस्थापकपदी नियुक्त करण्यात आले होते. मात्र, ते तिथे हजर झालेच नाहीत व आता त्यांची नियुक्ती पुणे स्मार्ट सिटीत झाली आहे.
आपण लवकरच रुजू होणार आहोत, असे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. अन्य काही बोलायला त्यांनी नकार दिला. सध्या स्मार्ट सिटीच्या सीईओ म्हणून महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार आहे. या पदावर राज्य सरकारने अमित सैनी या आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती केली होती; मात्र ते या पदावर हजर झालेच नाहीत. त्यामुळे संचालक मंडळाच्या बैठकीत अतिरिक्त कार्यभार पुन्हा देशभ्रतार यांच्याकडे देण्यात आला. आता राजेंद्र जगताप त्यांच्याकडून या पदाची सूत्रे स्वीकारतील.
जगताप लष्कराच्या छावणी मंडळाच्या (कॅन्टोन्मेंट) सेवेत होते. तिथून त्यांची प्रतिनियुक्तीवर पुणे महापालिकेत अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती झाली. सलग ५ वर्षे (फक्त एक महिना बाकी) ते या एकाच पदावर कार्यरत होते. या पदावर आयएएस अधिकारी असणे आवश्यक असताना त्यांच्याकडे कार्यभार देण्यावरून काही स्वयंसेवी संस्थांनी हरकत घेतली होती. ३ वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतरही ते त्याच पदावर असल्यामुळेही चर्चा होत होती; मात्र पुढे काही झाले नाही.
महापालिकेतील त्यांच्या कार्यकाळाला ५ वर्षे होण्यास एक महिना बाकी असताना साधारण दोन महिन्यांपूर्वी त्यांची महापालिकेतून बदली झाली. त्यानंतर बरेच दिवस त्यांना कुठेही नियुक्ती दिलेली नव्हती. साधारण महिनाभरापूर्वी त्यांना पीएमपीचे व्यवस्थापक म्हणून नियुक्त करण्यात आले. व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांच्या कामामुळे गाजत असलेल्या पीएमपीमध्ये जगताप हजरच झाले नाहीत. आता त्यांना पुन्हा पुण्यातच व तेही महापालिकेशी संबंधित असलेल्या स्मार्ट सिटी कंपनीत सीईओ म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. काँग्रेसचे नेते व माजी मंत्री पतंगराव कदम यांचे जगताप हे जावई आहेत. पतंगराव कदम यांचे सध्याच्या भाजपाप्रणीत सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांपासून अनेक वरिष्ठ मंत्र्यांशी निकटचे संबध आहेत. त्यामुळेच एखाद्या पदावरचा कार्यकाळ संपला तरी जगताप यांची बदली होत नाही, तसेच त्यांना हवा तो कार्यभार दिला जातो, अशीही चर्चा आहे.

Web Title: Rajendra Jagtap Smart City CEO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.