बारामतीतील राजेंद्र नवले शहीद
By Admin | Published: May 8, 2015 05:16 AM2015-05-08T05:16:37+5:302015-05-08T05:16:37+5:30
बारामती तालुक्यातील पाहुणेवाडी येथील शिवाजी ऊर्फ राजेंद्र बाजीराव नवले (वय ३८) या सैन्यदलातील जवानाला श्रीनगर येथे अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत
बारामती : बारामती तालुक्यातील पाहुणेवाडी येथील शिवाजी ऊर्फ राजेंद्र बाजीराव नवले (वय ३८) या सैन्यदलातील जवानाला श्रीनगर येथे अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत वीरमरण प्राप्त झाले. नवले यांच्यावर शासकीय इतमामात पाहुणेवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. नवले यांना वीर मरण प्राप्त झाल्याने गावात शोककळा पसरली आहे.
नवले हे पाहुणेवाडी दत्तोबानगर येथे वास्तव्यास आहेत. त्यांना वीर मरण प्राप्त झाल्याची माहिती त्यांच्या वरिष्ठ कार्यालयातून चुलत भावाला मोबाईलवर गुरूवारी सकाळी
देण्यात आली. सायंकाळी पुणे येथे विमानातून नवले यांचे पार्थिव आणण्यात आले. या ठिकाणी पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासह लष्कराने त्यांना मानवंदना दिली. त्यानंतर रात्री ९ वाजता त्यांचे
पार्थिव लष्कराच्या स्वतंत्र वाहनाने पाहुणेवाडी येथे आणण्यात आले. यावेळी त्यांच्या कुटुंबियांना शोक अनावर झाला होता. यावेळी पाहुणेवाडीसह आसपासच्या गावांमधील सर्व ग्रामस्थ एकत्रित आले. ग्रामस्थ, युवक यांच्या ‘अमर रहे, अमर रहे, वीर जवान शिवाजी नवले अमर रहे,’ या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. ट्रॅक्टरमधून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. पोलिसांनी बंदुकीच्या फैरी झाडून सलामी दिली. त्यानंतर येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. नवले यांच्या मागे वडील, पत्नी, दोन मुले, भाऊ, बहीण असा परिवार आहे. त्यांच्या अंत्यविधीला शासकीय अधिकाऱ्यांसह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.