राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारण्यास राजेंद्र पवार यांचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2022 01:26 PM2022-05-02T13:26:38+5:302022-05-02T13:32:04+5:30

या कार्यक्रमालाच जाणार नसल्याची भूमिका चेअरमन पवार यांनी घेतली

rajendra pawar refuses to accept award from governor bhagat singh koshyari | राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारण्यास राजेंद्र पवार यांचा नकार

राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारण्यास राजेंद्र पवार यांचा नकार

googlenewsNext

बारामती (पुणे) : राज्य शासनाचा जाहीर झालेला पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते स्वीकारण्यास बारामतीच्या अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार यांनी नकार दिला आहे. राज्यपाल  कोश्यारी यांच्या हस्ते आज (सोमवार) नाशिकमध्ये या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. या कार्यक्रमालाच जाणार नसल्याची भूमिका चेअरमन पवार यांनी घेतली आहे.

अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार हे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांचे पुतणे आणि डॉ. आप्पासाहेब पवार यांचे पुत्र आणि आमदार रोहित पवार यांचे वडील आहेत. आजवर शेती क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर पवार यांनी आनंद व्यक्त केला होता. परंतु ज्यांच्या हस्ते वितरण होत आहे हे समजताच त्यांनी सोहळ्याला जाणे मात्र टाळले.

या पार्श्वभूमीवर राजेंद्र पवार म्हणाले, या सोहळ्याला न जाण्यामागे अनेक कारणे आहेत. हा महाराष्ट्र शिवरायांचा आहे. शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लागणार नाही, याची काळजी या महान राजाने घेतली. त्यांचा आदर्श आपल्यापुढे आहे. ज्यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जात आहे, त्या पंजाबराव देशमुख यांनी कृषी धोरणात बदलासाठी मोठे योगदान दिले. शेतीच्या बाबतीत राज्य समृद्ध केले. मी आजवर शेती आणि शिक्षण क्षेत्रात काम केले. शिक्षण क्षेत्रात आपण महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांचे योगदान जाणतो. परंतु दुदैवाने गेल्या काही दिवसात महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाव घालण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

फुले दांपत्याविषयी खालच्या पातळीवर जाऊन मते मांडली जात आहेत. त्यांच्याविषयी खालच्या पातळीवर जाऊन मत मांडणारे, महाराष्ट्राचा इतिहास माहित नसणारे लोक महत्वाच्या पदावर आहेत. गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात अराजकता निर्माण केली जात आहे. याला खतपाणी घालणाऱ्यांच्या हस्ते मी हा पुरस्कार कसा स्वीकारावा? त्याऐवजी एखाद्या कृषी कार्यालयात अथवा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हा पुरस्कार मिळाला असता तर तो मी स्विकारला असता, अशी भूमिका राजेंद्र पवार यांनी स्पष्ट केली आहे.

Web Title: rajendra pawar refuses to accept award from governor bhagat singh koshyari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.