पुराणिक यांच्या दादागिरीच्या व्हिडीओची महिला आयोगाकडून गंभीर दखल; पुणे पोलिसांना तपासाचे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2022 01:21 PM2022-08-14T13:21:34+5:302022-08-14T13:40:24+5:30
महिला आयोगाच्या या भूमिकेमुळे पुराणिक यांच्या संकटात मोठी भर
धायरी : पुण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक यांच्या दादागिरीचा व्हिडीओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाल्यानंतर राज्य महिला आयोगाने या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. याबाबत एका महिलेने केलेल्या तक्रारीवर आयोगाने पुणे पोलीस आयुक्तांना संबंधित प्रकाराचा कसून तपास करण्याचे निर्देश दिले आहेत.
महिला आयोगाच्या या भूमिकेमुळे पुराणिक यांच्या संकटात मोठी भर पडली असून त्यांच्यावर पोलीस खात्याकडून कठोर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. निष्पाप नागरिकांना अमानुष पद्धतीने मारहाण तसेच अत्यंत अर्वाच्च शब्दांत केलेल्या शिवीगाळमुळे पुराणिक हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांच्या दादागिरीविरोधात संताप व्यक्त केला जात असून कठोर कारवाईची मागणी होत आहे. याचदरम्यान महिला आयोगाने तक्रारीची गंभीर दखल घेऊन तपासाचे निर्देश दिले आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक हे काही लोकांना शिवीगाळ करत मारहाण केल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमामध्ये प्रसारित होत आहे याबाबतीत एका महिलेची तक्रार महिला आयोगास प्राप्त झाली आहे. यापु्र्वीही एका महिलेला अशीच मारहाण केल्याचे तक्रारीत नमुद केले आहे pic.twitter.com/bhuPLLkqPq
— Maharashtra State Commission for Women (@Maha_MahilaAyog) August 13, 2022
वादग्रस्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक यांनी काही लोकांना अत्यंत अर्वाच्च शब्दांत शिवीगाळ केली. तसेच निष्पाप नागरिकांना बेदम मारहाण केली. या त्यांच्या दादागिरीचा अज्ञात व्यक्तीने व्हिडीओ बनवला असल्यामुळे पुराणिक हे कायदेशीर कारवाईच्या कचाट्यात सापडले आहेत. त्यांच्या दादागिरीचा व्हिडीओ समाजमाध्यमामध्ये प्रसारित झाला आहे. त्याचबरोबर याबाबतीत एका महिलेने राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली. महिलेची तक्रार प्राप्त झाली असून त्याआधारे आयोगाने पुणे पोलीस आयुक्तांना तपासाचे निर्देश दिले आहेत, असे ट्विट राज्य महिला आयोगाने केले आहे. पुराणिक यांनी यापु्र्वीही अशाच प्रकारे एका महिलेला बेदम मारहाण केली होती, असे तक्रारदार महिलेने तक्रारीत नमूद केले आहे. महिलेच्या या तक्रारीमुळे पुराणिक यांना त्यांची दादागिरी चांगलीच भोवणार असल्याचे चित्र आहे.